‘सुलतान’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काम करून आलेल्या थकव्याची तुलना बलात्कार पीडितेशी करून वाद निर्माण केलेल्या अभिनेता सलमान खानच्या वक्तव्यावर अभिनेता शाहरुख खानने आपले मत व्यक्त केले आहे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या वक्तव्याचे परिक्षण मी करू शकत नाही. तेवढी माझी पात्रता नाही, असे शाहरुखने म्हटले आहे. शाहरुखने यावेळी सलमानची बाजू घेणं टाळलं. तो म्हणाला की, ‘गेल्या काही वर्षात मी स्वत: देखील काही वादग्रस्त विधानं केली असल्याचं मला जाणवलं आहे. त्यामुळे एखाद्याने केलेल्या वक्तव्यावर मी बोलणं योग्य नाही.’

सलमानने त्याच्या ‘सुलतान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात सलमानने वादग्रस्त वक्तव्य केले होते. सुलतानचे चित्रीकरण हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. चित्रीकरणानंतर खूप थकवा यायचा. मला एका बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटयचं, असे वादग्रस्त विधान सलमानने केले होते. सलमानच्या या वक्तव्यावर चहूबाजूंनी जोरदार टीका केली गेली. इतकचं नव्हे, तर राज्य आयोगाने सलमानला नोटीस देखील धाडली.

सलमानच्या वक्तव्यावर शाहरुखला विचारण्यात आले असता, त्याने सावध पवित्रा घेतला. शाहरुख म्हणाला की, हा एखाद्याची बाजू घेणं किंवा न घेण्याचा विषय नाही. मी स्वत: खूप बोलतो. त्यामुळे कोण काय म्हणालं त्याचे परिक्षण कोणी करावं? असा प्रश्न उपस्थित होतो. स्पष्ट सांगायचं झालं तर मी एखाद्याने केलेल्या विधानाचे परिक्षण करण्याची पात्रता माझ्यात नाही, असेही शाहरुख पुढे म्हणाला.