‘बाहुबली द बिगिनिंग’ या चित्रपटामध्ये हातात साखळदंड आणि बेड्या अडकवलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा नवा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टी आणि अमरेंद्र बाहुबली यांच्याभोवती बरेच कथानक फिरणार असल्यामुळे या चित्रपटात तिच्या लूकवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. बाहुबली चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकताच ‘देवसेना’ (अनुष्का शेट्टी) आणि ‘अमरेंद्र बाहुबली’ (प्रभास) यांचा रॉयल लूक सर्वांसमोर आणला आहे.

आलिशान महालातील गादीवर बसलेली अनुष्का कोणा एका सुंदर राजकन्येप्रमाणेच दिसते आहे. तिची वेशभूषा आणि चित्रपटातील तिच्या भूमिकेची पार्श्वभूमी पाहता अनुष्काचा हा रॉयल लूक चाहत्यांच्या मनात घर करत आहे. एकीकडे अनुष्काच्या चेहऱ्यावरुन नजर हटत नाही तोच अभिनेता प्रभास साकारत असलेल्या अमरेंद्र बाहुबलीचाही नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभासची शरीरयष्टी आणि त्याचा नवा लूक पाहता हा ‘अमरेंद्र बाहुबली’ अनेकांचं भान हरपण्यासाठी सज्ज झाला आहे असच म्हणावं लागेल.

‘बाहुबली- द कन्क्लूजन’ हा चित्रपट २०१७ मधील सर्वात मोठा चित्रपट असून जगभरात तो जवळपास ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटीया आणि इतर सहकलाकारांच्या साथीने साकारलेला हा भव्य चित्रपट २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यासाठी अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिकिटबारीवर हिट ठरलेला ‘बाहुबली २’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.