एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तब्बल ६५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडेच सध्या सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र हवा असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासाठी यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागाने ६०० कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या नावे विविध विक्रमही प्रस्थापित केले गेले. पण बाहुबली एक या चित्रपटाने घसघशीत कमाई करुनही त्याचा काहीही फायदा झाला नाही, असेच म्हणावे लागेल. चित्रपट प्रदर्शक अक्षय राठी यांनी याबाबतचे विश्लेषण केले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ला राठींनी दिलेल्या माहितीनुसार, “या चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या संपूर्ण खर्चाचा विचार केला तर तो आकडा ४५० कोटींच्या जवळपास जातो. बाहुबली हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवण्यात आल्यामुळे या चित्रपटाच्या सेटपासून ते वीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्वर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. बाहुबली या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील काही महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते.” त्यामुळे एका अर्थी चित्रपटाच्या नफ्याची रक्कम पुन्हा चित्रपटातच गुंतवली जात होती असे म्हणायला हरकत नाही. यासंबंधी आणखी माहिती देत राठी म्हणाले, ‘एकाच वेळी या चित्रपटाच्या दोन्ही भागांवर इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे या दोन्ही चित्रपटांकडून होणाऱ्या नफ्याची अपेक्षा निर्मात्यांनी केली होती. या दोन्ही चित्रपटांच्या चित्रपटगृह हक्कांच्या विक्रीनंतर जवळपास ६०० कोटींची कमाई झाली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांच्या व्यवसायाचे आकडे पाहिले तर जवळपास १५० ते २०० कोटींच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा केली जात आहे.’

या चित्रपटाच्या व्यवहारामध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही मुख्य भूमिका बजावत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हक्क करणकडे असल्यामुळे यातून त्यालाही नक्कीच नफा होणार आहे. त्यामुळे या ‘बाहुबली २-द कन्क्लूजन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाशी संलग्न प्रत्येक व्यक्तीला नफा होणार आहे हे निश्चित, असेही अक्षयने स्पष्ट केले. कलाकार, निर्माते-दिग्दर्शक आणि चित्रपटासाठी बरीच मेहनत घेणाऱ्या प्रत्येकासाठीच ‘बाहुबली २’ कडून फार अपेक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातील गाणीही चर्चेचा विषय ठरत आहेत. अनुष्का शेट्टी, प्रभास, सत्यराज, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.