इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे. कलाविश्वालाही इंटरनेटचा बराच फायदा झाला आहे. मुख्य म्हणजे कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी यामुळे कमी झालीये. ही झाली इंटरनेट, सोशल मीडियाची एक बाजू. पण, सोशल मीडियाची दुसरी बाजू पाहता त्याला हलकीशी नकारात्मक झालर आहे ज्याचा फटका सध्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाला बसला आहे.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारताआधी दुबईमध्ये प्रदर्शित झाला आणि सर्वत्र फक्त ‘बाहुबली २’चाच गवगवा झाला. भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शना काही वेळ आधीच कुवेतच्या एका व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन ‘बाहुबली २’चं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. त्यानंतर एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. इतक्या दिवसांपासून सर्वांनाच लागून राहिलेली उत्सुकता आणि कुतूहलाच्या वातावरणामध्ये ही घटना घडल्यामुळे रंगाचा बेरंग झाला. या सर्व परिस्थितीची आढावा घेत सोशल नेटवर्किंग साइट्सवरुन लीक करण्यात आलेल्या ‘बाहुबली २’च्या पायरेटेड व्हर्जनची लिंक आढळल्यास ती डिलिट करावी असं आवाहन सध्या चित्रपट निर्मात्यांना केलं आहे.

बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट दुबईच्या एका फेसबुक युझरने लीक केला होता. २०१७ च्या सुरुवातीलाही ‘बोगन’ या तमिळ चित्रपटाची पायरेटेड कॉपीसुद्धा सोशल मीडियावर लीक झाली होती. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन एकाच दिवसात २.५ लाख वेळा पाहण्यात आले होते. चित्रपटाची पायरसी हा मुद्दा दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत असून त्याचा फटका चित्रपट निर्माते आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बसत आहे. त्यामुळे याबाबत आता संपूर्ण चित्रपटसृष्टीतून कोणते पाऊल उचलले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.