भव्यता आणि उत्तम कलाकृतीची अनुभूती देणारा ‘बाहुबली २’ हा चित्रपट बऱ्याच प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाप्रमाणे प्रेक्षकही ‘बाहुबली २’ची वाट पाहात होते असं म्हणायला हरकत नाही. पण ते म्हणतात ना, उत्साहाच्या भरात रंगाचा बेरंग होतोच. तसंच काहीसं या चित्रपटाच्या बाबतीतही झालं. बंगळुरू, दिल्ली आणि आणखी काही ठिकाणी ‘बाहुबली २’च्या स्क्रिनिंगच्या वेळी काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

प्रभास, राणा डग्गुबती आणि सहकलाकारांच्या अभिनयाचा आणखी एक पैलू पाहण्यासाठी दुप्पट रक्कम देत शक्य त्या मार्गाने प्रेक्षकांनी चित्रपटगृहं गाठली. पण, तिथे मात्र काही भलतच घडलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या एका चित्रपटगृहात ‘बाहुबली २’च्या पूर्वार्धाऐवजी चित्रपटाचा उत्तरार्ध दाखवण्यात आला. मुख्य म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी हा चित्रपटाचा उत्तरार्ध होता हे चाहत्यांच्या लक्षात आलं.

ट्विटरवरुन काही चाहत्यांना यासंबंधीचे ट्विट करत हा सावळा गोंधळ सर्वांसमोर आणला. ‘काल रात्री बंगळुरु येथील पीव्हीआर अरिनामध्ये ‘बाहुबली २’च्या पूर्वार्धाऐवजी उत्तरार्ध दाखवण्यात आला. प्रेक्षकांनाही हे सर्व अगदी शेवटच्या क्षणी कळलं.’, असं ट्विट टी.एस. सुधीर यांनी केलं. या सर्व गोंधळानंतर पुन्हा एकदा सुरुवातीपासून चित्रपट दाखवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली.

बंगळुरूतच नव्हे तर दिल्लीत साकेत परिसरातील एका चित्रपटगृहातही असाच काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. ‘बाहुबली २’ सुरु असतानाच एक-दोनदा नव्हे तर तीन वेळा चित्रपटात व्यत्यय आला. पहिल्या दोन वेळांना चित्रपट पुन्हा सुरु करण्यात आला. पण, तिसऱ्या वेळी मात्र पडद्यावर काहीच दृश्य दिसत नव्हतं, संवाद मात्र ऐकू येत होते. त्यानंतर प्रेक्षकांनी खंत व्यक्त करत या सर्व प्रकाराची कल्पना चित्रपटगृह व्यवस्थापकांना दिली. राजामौलींच्या चित्रपटाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळत असताना आता याच प्रेक्षकांची अशी हेळसांड होत असेल तर कसं होणार असाच प्रश्न काही प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे.