अभिनेत्री बिपाशा बसूने ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड’च्या दरम्यान पती करण सिंग ग्रोव्हर रोमँटिक असल्याचे सांगत आपण स्वत: प्रेमामध्ये व्यवहारिक असल्याचे सांगितले. ‘अलोन’ चित्रपटातून बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरचे प्रेम फुलेले होते. त्यानंतर ही जोडी विवाह बंधनात अडकली. विवाहानंतर त्यांच्या दोघांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा बॉलिवूड वर्तूळात रंगल्या होत्या. पण बिपाशाने आपल्या पतीच्या प्रेमाचे कौतुक करत दोंघाच्या नात्यात अजिबात दुरावा नसल्याचे स्पष्ट केले. करण हा माझ्यापेक्षा रोमँटिक असल्याचे सांगत मी त्याच्या इतकी रोमँटिक नाही, असे बिपाशा कार्यक्रमानंतर म्हणाली. प्रेमाच्या बाबतीत मी व्यवहारिक असल्यामुळे मी प्रेमात यशस्वी नाही, असे तिने यावेळी सांगितले. दोघांच्यातील विरोधाभासामुळे आमचे प्रेम संतुलित राहते, असे सांगायला देखील बिपाशा विसरली नाही.

‘अलोन’ या चित्रपटाप्रमाणे आणखी प्रोजेक्टवर काम करण्यास उत्सुक असल्याचे बिपाशा यावेळी म्हणाली. आम्हाला अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळत आहेत. मात्र चित्रिकरणाच्या तारखा आणि पैसा यावर दोघेही सजग असल्याचे ती म्हणाली. ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड’मध्ये करण सिंह ग्रोवर सूत्रसंचालन केले होते. यासंदर्भात पती करणला तू काय सल्ला दिलास का? असा सवाल बिपाशाला यावेळी विचारण्यात आला होता. यावर बिपाशा म्हणाली की, मी स्वत: एकाच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्यामुले करणला मी सल्ला देणे योग्य समजत नाही.

बिपाशा आणि करणच्या मतभेदाबद्दल जशा चर्चा रंगल्या अगदी तशाच चर्चा हे जोडपे वारंवार प्रसुतीशास्त्रातील तज्ज्ञांची भेट घेत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. गरोदरपणाच्या रंगलेल्या चर्चेच्या वृत्तांना बिपाशाने धुडकावून लावले आणि लोकांनी तिच्या तसेच करणच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करावा असे म्हटले होते. बिपाशा म्हणाली की, आमच्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाचा आदर करत लोकांनी त्यास आमच्यावर सोपवावे. तिच्या या स्पष्टीकरणानंतर करण आणि बिपाशाच्या चाहत्यांना अजून थोडा वेळ तरी त्यांच्या छोट्या पाहुण्यासाठी थांबावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करण आणि बिपाशाने यावर्षी ३० एप्रिलला लग्नगाठ बांधली होती. अगदी खासगी पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला होता. पण, त्यानंतर त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींकरिता रिसेप्शन ठेवले होते. या दोघांवरही त्यांचे चाहते किती प्रेम करतात हे चांगलेच माहित आहे. त्यामुळे ते अगदी लहान गोष्टही सोशल मिडीयावर शेअर करत असतात.