बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी राजकीय नेत्यांच्या नावावरून सार्वजनिक ठिकाणांना नावे का देण्यात येतात यावर प्रश्न उभा केला आहे. याविषयी ऋषी कपूर म्हणाले की, देशात इतरही नामांकित व्यक्ती आहेत. ज्यांचे या देशासाठी खूप चांगले आणि महत्त्वपूर्ण असे योगदान राहिले आहे. जयपूर साहित्य उत्सवात ते बोलत होते.

गेल्याच वर्षी ऋषी कपूर यांनी रस्ते, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांची नावे गांधी कुटुंबावरून ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उभे करून वादाला आमंत्रण दिले होते. जयपूर साहित्य उत्सवातील एका सेशन दरम्यान बोलताना ऋषी कपूर म्हणाले की, या देशात कोणत्याही गोष्टीचे नाव राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवले जाऊ नये, असे मी सुरुवातीपासूनच बोलत आलो आहे. देशात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे आपल्या देशासाठी महत्त्वाचे योगदान राहिले आहे. तुम्ही लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटा यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकता का? राजकीय व्यक्तिंच्या नावावरून एखाद्या गोष्टीचे नाव ठेवण्यापेक्षा या व्यक्तिंच्या नावावरून त्याचे ठेवले जावे. आपल्या देशात अनेक रस्ते, इमारती, पूल आणि रुग्णालयांची नावे ही राजकीय नेत्यांच्या नावावरून ठेवली जातात. त्यामुळे आपण काही महत्त्वाच्या व्यक्तिंच्या नावांकडे दुर्लक्ष करत आहोत असे तुम्हाला वाटत नाही का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, माझा कोणत्याही एकाच कुटुंबावर राग नाही. पण मी जेव्हा विशिष्ट कुटुंबाच्या नावावरून एखाद्या गोष्टीचे नाव ठेवलेले पाहतो तेव्हा मला त्रास होतो. कारण, लता मंगेशकर, जेआरडी टाटा यांसारख्या अनेक व्यक्तिंनी मुंबईसाठी योगदान दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांचे खुल्लम खुल्ला हे आत्मचरित्रपर पुस्तकाचे अनावरण आले. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी आपले आयुष्य खुलेआमपणे मांडण्यासाठी पुस्तकाचा आधार घेतला आहे. त्यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकातून आपल्या जीवनातील घटनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. नुकतेच त्यांनी पत्नी नीतू यांच्या साक्षीने दिल्लीमध्ये आपल्या आत्मचरित्राचे अनावरण केले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ऋषी कपूर यांची कन्या रिधिमा आपल्या कुटुंबियासोबत उपस्थित होती. मात्र रणबीर या कार्यक्रमामध्ये दिसला नाही. या कार्यक्रमामध्ये ऋषी कपूर यांनी रणबीच्या बालपणीच्या आठवणी सांगत कार्यक्रमामध्ये रणबीरची कमी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मी चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे रणबीर हा माझ्यापेक्षाही आई नीतूसोबत जास्त काळ असायचा. त्याला माझी गरज असल्याचे कळत असून देखील मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. असे सांगत ऋषी यांनी मुलासोबतच्या संबंधातील निर्माण झालेल्या दरीबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली. बदलत्या पिढीनुसार रणबीर आपल्या मुलांसोबत माझ्यासारखे वागणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रणबीरचा मित्र होऊ शकत नसल्याचेही सांगितले.