महिलांना येणा-या मासिक पाळीबद्दल नेहमीच दरवाजामागे चर्चा केली जाते. मासिक पाळीबद्दल योग्य ती माहिती नसल्यामुळे अनेक मुलींना आणि स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. तसेच याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यासंबंधी मुलींना शिकवले जाते. या संकोचामुळे वयात आलेल्या बऱ्याच मुलींचे शाळेत जाणे थांबते. त्यामुळे असे विषय केवळ घरात न बोलता त्यावर खुलेपणाने चर्चा करण्याची गरज असल्याचे मत बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर-खानने युनिसेफ (UNICEF) तर्फे उत्तर प्रदेश येथे आयोजित एका कार्यक्रमात मांडले.
करिना म्हणाली की, मासिक पाळीविषयी उघडपणे चर्चा केली पाहिजे. हे विषय सोशल मिडिया, संकेतस्थळांसारख्या माध्यमांतून सर्वांसमोर मांडायला हवेत. मासिक पाळी आल्यावर मुलींकडे किंवा स्त्रीकडे बुरसटलेल्या विचारांनी बघितले जाते. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये महिला अपवित्र होतात, असे तुम्ही कसे म्हणू शकता? आम्हाला महिन्याचे तीसही दिवस काम असते. आम्ही आमचे काम थांबवू शकत नाही. यावर उपाय म्हणून योग्य ते प्रॉडक्ट वापरून स्वच्छ राहून आरोग्याची काळजी घ्यायला हवी. खास करून मुलींना या दिवसांमध्ये अस्वच्छ किंवा अपवित्र म्हणून त्यांना शाळा का बुडवावी लागते? असा सवालही करिनाने केला.