लहानपणापासून एकत्र वाढलेल्या तीन मित्रांची किंवा दोन मित्रांची गोष्ट हिंदी सिनेमामध्ये लोकप्रिय ठरत आली आहे. बॉलीवूड फॉम्र्युला म्हणून प्रस्थापित असलेली ही मैत्रीची गोष्ट आजच्या काळात अतिशय प्रभावी तरीही साधी-सरळ-सोप्या पद्धतीने सांगण्याचा अप्रतिम प्रयत्न दिग्दर्शकाने ‘काय पो छे’ या चित्रपटाद्वारे केला आहे. गुजरातमध्ये झालेला भूकंप आणि गोध्रा जळीतकांडानंतर झालेली दंगल या पाश्र्वभूमी आणि क्रिकेट हा भारतीयांचा सर्वाधिक आवडता खेळ या अनुषंगाने चित्रपट पाहताना प्रेक्षक दंग होऊन जातो. मैत्रीचे भावनिक बंध, नात्यांमधला क्वचित संघर्ष, मैत्रीला असलेले नाजूक पदर अतिशय साध्या पद्धतीने उलगडून सांगणारा सिनेमा प्रेक्षकाला त्याच्या आयुष्यातील मैत्रीची कडू-गोड प्रसंगांची आठवण नक्कीच करून देतो.
ईशान भट (सुशांत सिंग राजपूत), ओमकार शास्त्री (अमित साद) आणि गोविंद पटेल (राज  कुमार यादव) हे अहमदाबादमध्ये राहणारे लहानपणापासूनचे जिवलग मित्र शिक्षण पूर्ण करतात. ईशान क्रिकेटवेडा आहे. त्याला स्वत:ची अ‍ॅकॅडमी सुरू करायची आहे. ओमकार ऊर्फ ओमी  हा एका पुजाऱ्याचा मुलगा आहे. ‘हॅपी गो लकी’ असा ओमी ईशान-गोविंद यांच्याबरोबर ते म्हणतील ते करायला तयार असतो. गोविंद हा महत्त्वाकांक्षी, पैसे कमाविण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवून श्रीमंत व्हायची स्वप्ने पाहणारा तरुण आहे. गोविंद अभ्यासात हुशार, नेमस्त स्वभावाचा आणि हिशेबी वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याला नेहमी ‘कंजूस’ ठरविले जाते. ईशान हा तापट स्वभावाचा, जरा काही मनाविरुद्ध झाले की भडकून वाट्टेल त्या थराला जाणारा मनस्वी तरुण आहे. तर ओमी हा सरळ साधा, मित्र म्हणतील ते करायला तयार असणारा असा तरुण आहे. आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी तिघेही एकत्रित प्रयत्न करतात. गुजरातमधील भूकंपामुळे आणि दंगलीमुळे या तिघांच्या मैत्रीवर परिणाम होतो, संदर्भ बदलतात. पण मैत्रीची वीण घट्ट राहते.
शिक्षण पूर्ण करूनही बेकार असलेल्या तिघांच्या घरची मंडळी त्यांना सतत टोचून बोलतात. क्रिकेटचा सामना पाहताना घराजवळून गाडी घेऊन जाणारा एक तरुण सतत गाडीचा हॉर्न वाजवतो म्हणून ईशान चिडून बाहेर येतो आणि त्याला मारतो. त्या तरुणाला माफी मागायला लावतो. गडबड काय आहे म्हणून ईशानचे वडील घराबाहेर येतात आणि भडकलेल्या ईशानला विचारतात की तू त्याला माफी मागायला सांगतोस, तू माझी माफी कधी मागणार आहेस. एवढय़ाशा छोटय़ा प्रसंगांतून बेकार तरुणाच्या वडिलांची मनस्थिती, ईशानची मनोवस्था यांसारख्या गोष्टी प्रकर्षांने प्रेक्षकाला चटकन लक्षात येतात. अशाच छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून तिन्ही मित्रांचे भवताल, त्यांचे स्वभाव, एकमेकांच्या स्वभावाची चांगलीच ओळख असूनही एकमेकांना हिमतीने सावरण्याची त्यांची भूमिका अशा मैत्रीची अनेक छटा दिग्दर्शकाने छानपैकी उलगडून दाखविल्या आहेत. चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट पुस्तकाइतकाच प्रभावी झाला आहे. चित्रपटाची गोष्ट, संवाद हे बलस्थान तर आहेच. त्याचबरोबर तिन्ही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी केलेली पात्रनिवड हेही बलस्थान ठरले आहे. लोकप्रिय, नावाजलेल्या कलावंतांना न घेता नवोदित कलावंतांची निवड दिग्दर्शकाने अतिशय समर्पक आहे हे सिद्ध केले आहे.  कुठेही ‘फिल्मी’ न होणारा हा सिनेमा वास्तवाला धरून असला तरी खटकत नाही. पटकथेतील व्यक्तिरेखांचा प्रवास असाच होऊ शकतो, हे सहजपणे प्रेक्षकाला पटते. तिन्ही प्रमुख कलावंतांबरोबरच अमृता पुरीने साकारलेली विद्याही लक्षात राहते, त्याचबरोबर लक्षात राहतो अली हा मुलगा. दिग्विजय देशमुख या बालकलाकारने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याने केलेल्या अभिनयाचे श्रेयही दिग्दर्शकाला द्यायला हवे. छायालेखन हीसुद्धा चित्रपटाची जमेची बाजू आहे. सेट डिझाईन्समधून व्यक्तिरेखांचा मध्यमवर्गीय स्तर ठसतो. राजकीय घडामोडी दाखवितानाही चित्रपट बटबटीतपणाकडे झुकू देण्याचे कौशल्यही दिग्दर्शकाने दाखविले आहे. यापूर्वी येऊन गेलेल्या ‘दिल चाहता है’ किंवा यांसारख्या सिनेमांची आठवण झाली तरी आजच्या काळाला अनुसरून  बनविलेला ‘काय पो छे’ न आवडला तरच नवल.
काय पो छे
निर्माते – रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शक – अभिषेक कपूर, कथा – चेतन भगत , पटकथा-संवाद – चेतन भगत, अभिषेक कपूर, पुबाली चौधरी, सुप्रतीक सेन, छायालेखक – अनय गोस्वामी, संगीत – अमित त्रिवेदी, संकलन – दीपक भाटिया, कलावंत – सुशांत सिंग राजपूत, अमित साद, राज कुमार यादव, अमृता पुरी, दिग्विजय देशमुख, चित्रांजन ठाकूर, मानव कौल, बकुळ स्याल, रोहित भटनागर, मनिष चावला, दिनेश कुमार, ईशान भगत