एका धक्क्यातून सावरता येते न येते तोच दुसरा धक्का…
नागपूरचा अगदीच तरुण आर जे शुभम केचे याचे स्टुडिओतच वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षीच ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन.
इतक्या लहान वयातही ह्रदयविकाराचा धक्का कसा काय येऊ शकतो याचा जरा कुठे विचार सुरु होतोय तोच अश्विनी एकबोटे भरत नाट्य मंदिरात रंगभूमीवरच नाट्यत्रिविधा कार्यक्रम सादर करीत असताना भैरवी रागावर नृत्य सादर केल्यानंतर शेवटी तोल जाऊन पडली तीही ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत पावली. वय अवघे चव्वेचाळीस. पाठोपाठ अशा दोन घटना घडल्याने साहजिकच काही नेहमीचे प्रश्न चर्चेत आलेच. कला क्षेत्रातील धावपळीत स्वतःच्याच तब्येतीकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नसेल तर कामाचे योग्य नियोजन करता येत नाही का? वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीच ही सगळीच धडपड आहे का? या क्षेत्रात शारीरिक व मानसिक अशी दोन्ही प्रकारची धावपळ होते याचे भान का राहत नाही वगैरे वगैरे वगैरे या प्रश्नांभोवती चर्चा रंगते, काही कलाकार यावरून खरोखरच सावधही होतात. आपला कामाचा वेग कमी करतात. काहीजण कामासह जगण्याची शैलीही बदलतात. काहीना वाटते पौष्टीक खाणे हाच आधार. तर काहीजण व्यायामाला खरोखरच प्राधान्य देतात.

असे काही अपवाद करता प्रत्यक्ष या मनोरंजन क्षेत्रात भटकंती निरीक्षण व लहान मोठ्या भेटीगाठीतून काय ‘चित्र’ दिसते? तर पळा पळा कोण पुढे पळे तो अशी जणू स्पर्धा लागलीय. ती स्पर्धा एकाच वेळेस स्वतःशी, इतरांशी व या क्षेत्रातील वातावरणाशीही आहे. यातून अनेकांची विविध कारणास्तव सुटका देखील नाही. काहींना वाटते तरुणपणी धावपळ करून पैशाची तरतूद केली तर मध्यम वयात कामाचा वेग कमी करता येईल. पण या क्षेत्रातील सध्याची परिस्थिती खरंच कलाकारांना निवडीचे स्वातंत्र्य देणारे आहे का?

फार पूर्वी कलेसाठी कला होती. मराठी चित्रपट व नाटकांत भूमिका करून फारसा पैसा मिळत नसे. म्हणून तर रमेश भाटकरने अभिनय कारकीर्द करतानाही टेल्कोतील आपली नोकरी एकोणीस वर्षे कायम ठेवली.

जीवनासाठी कला हा यातलाच प्रकार. प्रमुख पाहुणा म्हणून कोठे बोलावले गेल्यावर आपल्या लोकप्रियतेची किंमत वसूल करणे. लक्ष्मीकांत बेर्डेने ही प्रथा आणली. त्यात काहीच गैर नव्हते. कारण या काळातही अभिनयाचे फारसे मूल्य मिळत नव्हते. त्यामुळेच अन्य गोष्टीतून मिळणार्‍या पैशातून गाडी येई.

आता काही अपवाद केले तर पैशासाठी कला ही भावना, हाच फोकस आहे आणि तशीच विपूल संधीदेखील आहे. पण म्हणूनच खूप धावपळही आहे. त्यातूनच दमछाक आहे. वय वाढतंय व शरीर थकतंय याची जाणीव होत नाही.

चित्रपट-नाटक-महामालिका-गेम शोज-रिअॅलिटी शो-सुपारी-इव्हेंट ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर-जाहिरातपट-चित्रपटाचे प्रमोशन-निवडणूक प्रचार-मंगळागौर-फोटो सेशन-गोकुळाष्टमीतील नाचानाच-रात्रौ उशिरापर्यंतच्या पार्टीतील वावर…इतकी कामे असल्यावर धावपळ व दगदग होणारच सगळेच कलाकार अशा सगळ्याच गोष्टींना वाहून घेत नाहीत. पण बरेचसे शक्य करतात.

नाटकावरून चित्रपटाच्या सेटवर जा. तेथून एखादी सुपारी साध्य करण्याचा प्रयत्न कर. एका सुपारीतून दुसरी मिळतय का बघ? बरं आजही अभिनयापेक्षा अशाच अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून रहावे लागतेच. कारण त्यात झटपट व सहज पैसा आहे. पैशातूनच सर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात होणार ही एकूणच समाजाची मानसिकताच असल्याने त्यात कलाकार अपवाद कसे ठरतील? त्याना तर नवीन मॉडेलची गाडी, शक्य तर स्वतःचीच व्हॅनिटी, किमान दोन आयफोन, प्रशस्त घर ,घरात ऊंची फर्निचर, होम थिएटर….गरजा संपतच नाहीत. त्यासाठी लागणारा पैसा संपू शकतो. म्हणून तर चित्रपटाच्या प्रमोशनचेही मानधन हवे व आणखीन कशाकशाचे शक्य आहे त्याचेही पैसेच हवेत. या वस्तुस्थितीला काही कलाकार अपवाद असतीलही. पण बदलती परिस्थिती स्वस्थ बसूनच देत नाही. बाहेरगावाहून आलेल्या लहान मोठ्या कलाकाराना फार काळ भाडेतत्त्वावर रहावेसे वाटत नाही. मुंबईत आपले घर असावे या स्वप्नासाठी ते धडपडतात. ज्यांचे घर मोठे आहे त्याना आणखीन मोठे हवे.

कधी मालिका संपल्यावर असुरक्षित वाटते तर कधी नवीन चित्रपटाच्या ऑफर कमी झाल्या की बैचेनी येते. नाटकाच्या बाबतीत तर अडीच तीन तास भूमिकेतून बाहेर पडता येत नाही. त्यामुळेच त्या व्यक्तीरेखेचे ताणही सोबत राहतात. नृत्य अभिनयाचा सर्वोत्तम अविष्कार पण त्याचे शिक्षण व रिहर्सल आणि मग परफॉर्मन्स हे सगळेच दमछाक करणारे आहे. पण आता थेट विदेशात जाण्याच्या संधी वाढल्याने हे सर्व टिकून राहावे असेच वाटणे स्वाभाविक आहे. सैराट सुपर हिट ठरुन रिंकू राजगुरु लोकप्रिय ठरल्याने अनेकींना धक्का बसणे स्वाभाविक आहे. तिच्या सुपारीची संख्या व त्याचे मानधन विलक्षण वाढल्याने अनेकींना ही कसर भरून काढण्यासाठीच इतरत्र धावपळ करणे आलेच.
वाढती संपर्क माध्यमे व वाढती वाहतूक व्यवस्था यामुळेच कलाकार अधिक व्यावसायिक व गतिमान झाले. आज गोव्यात नाट्यप्रयोग करणारा उद्या सकाळपर्यंत नागपूरला असतो. रात्रौ तो मुंबईत पेज थ्री पार्टीला येतो. पहाटेपर्यंत नाचतो मिठ्या मारतो व सकाळीच नाशिकला निघतोही. गाडीत वा विमानात झोप घेतो रे असा तो…. अनेकदा तीच सांगून पुढील प्रवास सुखकारकपणे सुरुच. गाडीत फळे असतानाच हे देखील सांगणार पण ती खायची आठवण होते का असे विचारणे बरे दिसत नाही.

आपली अभिनय क्षमता, शारीरिक व मानसिक ताकद याची जाणीव स्वतःलाच असण्याचे युग आहे. अनेक जण उच्चशिक्षित आहेत. फोकस आहेत. पण आजूबाजूची परिस्थिती मोहात पाडते. ठरलेले लग्न मोडतंय, सुखाचा संसार बिघडतोय, घटस्फोट होताहेत, एकटे राहिलो तर कामावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करून भरपूर आनंद घेऊ अशी वृत्ती वाढतेय.

या सार्‍यातून स्वतःला सावरता येणारे आहेत. तर महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या झपाट्यात शरीराला कशाने पोखरून टाकलंय वा मधुमेह ब्लड प्रेशरने कधी आपल्यावर कब्जा केला हे लक्षातच येत नाही. एखाद्या दिवशी शुभम केचे अवघ्या बाविसाव्या तर अश्विनी एकबोटे चव्वेचाळीसाव्या वर्षी अचानक गेल्यावर वाटते काम दौरे सुपारी सर्वच कमी करावेसे अगदी प्रामाणिकपणे वाटते. पण तेवढ्यात लक्षात येते कधी नव्हे ते दक्षिण आफ्रिकेत जाण्याची संधी आहे. अलिबाग वा पुण्यात सेकंड होम घ्यायचेय. अमूक तमुक दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम मिळतंय ही भूमिका छोटी असली तरी चित्रपटाचे प्रमोशन लय भारी होईल. छे छे भरपूर काम करण्यास हीच योग्य वेळ आहे….
– दिलीप ठाकूर