अभिनेता जॉन अब्राहमचे बिलबाँग शाळेत प्रतिपादन
समाजातील दुर्लक्षित घटकांच्या स्वास्थ्यासाठी शाळेतील मुलांनी जे प्रयत्न केले, ते कौतुकास्पद असून हे विद्यार्थी देशाचे भावी हीरो आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांचे आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा देश पातळीवरील अभियानाचा सगळ्यात उत्तम प्रयोग असतो, असे मत सिनेअभिनेता ठाण्यातील बिलबाँग शाळेत व्यक्त केले.
‘हॅबिटेट फॉर ह्य़ुमॅनिटी इंडिया’ या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘रुपी फॉर चेंज’ अभियानात ठाण्यातील बिलबाँग शाळेने प्रथम येण्याचा मान पटकावला. या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ बिलबाँग शाळेत प्रसिद्ध सिनेअभिनेता जॉन अब्राहमच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. देश पातळीवरील या अभियानात बिलबाँग शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम योगदान देऊन २०० शाळांमधून पहिले येण्याचा मान पटकावला.
एक रुपया समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात चांगला बदल घडवून आणू शकतो, याची जाणीव इतरांना विद्यार्थ्यांनी करून दिली आहे. संस्थेने या अभियानात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत त्यांच्या मनात तळागाळातील लोकांबद्दल एक संवेदना निर्माण केली आहे. दारिद्रय रेषेखालील लोक, अनाथ मुले, स्वच्छतेच्या मूलभूत सोयीसुविधांचा समाजात अभाव असणे या सामाजिक समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण करणे गरजेचे आहे हा विचार यानिमित्ताने मुलांच्या मनावर ठसेल असे मत जॉन अब्राहम याने मांडले.