घेई छंदपुस्तकाचे बुधवारी मुंबईत प्रकाशन

वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा तसेच ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून नवी खेळी सुरु करणारा अभिनेता सुबोध भावे आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. सुबोधची ही भूमिका लेखकाची असून त्याने लिहिलेल्या ‘घेई छंद’ या पुस्तकाच्या निमित्ताने तो या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बालगंधर्व’ चित्रपटातून बालगंधर्वाच्या भूूमिकेत त्याने अभिनयाची एक वेगळी उंची गाठली. ‘लोकमान्य टिळक’ चित्रपटातून तो एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला तर अगोदर ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकातील भूमिका आणि नंतर याच नाटकावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन व भूमिका अशी दुहेरी जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडली. आता ‘घेई छंद’च्या निमित्ताने तो लेखक म्हणून पहिले पाऊल टाकत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे तर १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे वेगवेगळ्या कार्यक्रमात होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कटय़ार’ या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या हस्ते होणार असून रसिक आंतरभारती व ग्राफ्ट ५ पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या औपचारिक प्रकाशन सोहळ्यात सुबोध भावेचा ‘कटय़ार ते कटय़ार’ प्रवास गप्पा, आठवणी किस्से यातून उलगडला जाणार आहे.