अभिनेता सुमीत राघवन सध्या त्याच्या दुसऱ्या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये मग्न आहे. या सिनेमात तो नाना पाटेकरांसोबत काम करणार आहे. पाटेकरांसोबत काम करतानाचा अनुभव व्यक्त करताना सुमीत म्हणाला की, ‘सुरूवातीला नानांसोबत काम करण्याचं थोडं दडपण आलं होतं. ते पटकन चिडतात असं आपण त्यांच्या बाबतीत ऐकून होतो. पण खरं सांगू का ते तसे नाहीयेत. मी सेटवर असताना त्यांच्यापासून थोडा लांबच राहीन असा विचार केला होता, पण त्यांच्यासोबत काम करायला सुरूवात केल्यानंतर त्यांच्यापासून लांब राहण्याची कधी गरजच पडली नाही.’

‘सिनेमाबद्दल काहीही शंका असेल तर त्यांच्याशी बोलता येतं आणि प्रत्येक सीन झाल्यानंतर तो योग्य झाला की नाही असंही ते विचारतात. तसंच मोकळ्या वेळात आम्ही दोघं पत्ते खेळायचो. एकत्र गाणी गाणं, मजा मस्ती करणं हे तर आमचं नेहमीच व्हायचं. याशिवाय चित्रीकरणावेळीही ते नेहमीच मार्गदर्शन करायचे. अभिनयाशी निगडीच अनेक विषयांवर आम्ही चर्चाही केल्या आहेत.’

पुढे सुमित म्हणाला की, ‘खऱ्या जीवनात ते नेहमीच मजा मस्ती करत असतात. पण जेव्हा ते काम करतात तेव्हा त्यांचे पूर्ण लक्ष फक्त त्यांच्या कामावरच असते. एखाद्या सीनचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी ते त्यांचे संवाद लिहून घेतात. जेव्हा मी त्यांना असं करण्याचं कारण विचारलं तेव्हा आपले संवाद लक्षात ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे असं ते म्हणाले. आपले संवाद लिहून घेतल्याने ते तुमच्या डोक्यात अगदी पक्के बसतात असं ते म्हणाले.’

सुमीत आणि नाना यांच्या या आगामी सिनेमाचे टायटल अजूनपर्यंत निश्चित झाले नसून, काटकोन त्रिकोण या मराठी नाटकावर आधारीत आहे. नवरा, बायको आणि पोलीस अधिकारी यांच्याभोवती या सिनेमाची कथा फिरते. अजय देवगणची ही निर्मिती आहे.