तरुणाईची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ रंगभूमीवर अवतरणार; ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात नाटक रंगभूमीवर

‘सुबक’ आणि ‘कलाकारखाना’ यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेले तरुणाईचे नवे नाटक ‘हर्बेरियम’ या उपक्रमाअंतर्गत अभिनेते सुनील बर्वे आता रंगभूमीवर सादर करणार आहेत. काही वर्षांपूर्वी या उपक्रमाअंतर्गत सुनील बर्वे यांनी रंगभूमीवर गाजलेली जुनी नाटके सादर केली होती. मात्र आताचे त्यांचे नाटक  पूर्णपणे नवे व ‘फूल टु तरुणाई’ असणार आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’या गाजलेल्या मालिकेतील काही कलाकार नाटकात काम करणार असल्याने रंगभूमीवर तरुणाईची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ अवतरणार आहे.

सुनील बर्वे यांचा ‘हर्बेरियम’ हा उपक्रम खूप गाजला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळ दळताय’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच जुन्या नाटकांचे प्रयोग सादर केले होते. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पाहाता यावी, या उद्देशाने बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. आता ‘सुबक’ निर्मित ‘अमर फोटो स्टुडिओ’हे नवे नाटक ते रंगमंचावर सादर करणार आहेत.

या नाटकाच्या लेखनापासून दिग्दर्शन, अभिनय अशी सगळीच आघाडी तरुणाईने सांभाळली आहे. मनस्विनी लता रवींद्र यांनी नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांचे आहे.

नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश बोरकर आदी कलाकार आहेत. नाटकाचे संगीत आणि सोशल मीडियावरची प्रसिध्दी गंधार संगोराम यांची आहे. तर नाटकातील गीते केतन डांगे यांनी लिहिली आहेत.

हे नाटक संगीतमय प्रेमकथा असून ‘फोटोस्टुडिओ’भोवती त्याची कथा गुंफण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार असल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.

‘हर्बेरियम’ उपक्रमाअंतर्गत रसिक प्रेक्षकांनी पुन्हा सादर केलेल्या जुन्या नाटकांचे भरभरुन स्वागत केले होते. तसाच चांगला प्रतिसाद आमच्या या नव्या नाटकाला मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन बर्वे म्हणाले, या नाटकानंतर पुन्हा एकदा ‘हर्बेरियम’ अंतर्गत गाजलेली जुनी नाटके सादर करण्याचा विचार आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर रंगभूमीवर नवे काही करण्याची इच्छा होती. त्यासाठी ‘सुबक’ बरोबर नाटय़निर्मितीत सहभागी होता येईल का?, अशी विचारणा सुनील बर्वे यांना केली.

त्यांनी या कल्पनेला होकार दिल्यानेच ‘अमर फोटोस्टुडिओ’चा जन्म झाला, असे या ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या टीमने सांगितले.