अभिनेता सुनील बर्वेने सिनेमा, मालिका आणि रंगभूमी गाजवून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सुनील नेहमीच आपल्याला विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. सध्या त्याचे ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक रंगमंचावर सुरू आहे. या नाटकाचा २५ वा प्रयोग लवकरच होणार आहे.

आतापर्यंत ‘सुबक’ कडून ज्या नाटकांची निर्मिती करण्यात आली त्याचे फक्त २५ प्रयोगच सादर करण्यात आले होते. २५ व्या प्रयोगनंतर पुन्हा प्रयोग होत नाही. आतापर्यंत ‘सुर्याची फुले’, ‘हमिदाबाईची कोठडी’ अशा गाजलेल्या नाटकांचेही २५ प्रयोग झाले. म्हणूनच कोणत्याही नाटकाचा २५ वा प्रयोग आला की आम्ही कलाकार भारावून जायचो असे त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे. आता अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचा देखील पंचवीसावा प्रयोग होत आहे. म्हणूनच तो जरा भावूक झाला होता.

पण ‘सुबक’च इतक्या वर्षांची ही परंपरा अमर फोटो स्टुडिओने मोडून काढली आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता हे नाटक आता सुरुच राहणार असल्याने सुनीलला आनंद झाला आहे. तो सांगतोय, ”आता वेळ बदललीय, आधी पालक मुलांना नाटक दाखवायला आणायचे. पण आता मुलेच पालकांना नाटकाच्या प्रयोगांना घेऊन येत आहेत.” सध्याच्या पिढीने रंगमंचाकडे पाठ फिरवल्याची सगळीकडे बोंबाबोंब आहे सुनीलने मात्र ही गोष्ट खोटी असल्याचे लिहिले आहे. ते काहीही असले तरी अमर फोटो स्टुडिओचे प्रयोग सुरुच राहणार असल्याने नाट्यरसिकांना मात्र चांगली मेजवानीच मिळाली आहे.