‘दुहेरी’ मालिकेत सुनील तावडेंचा नर्सचा अवतार

अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘दुहेरी’ या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेमुळे प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देताना त्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनी एक नवे आव्हान स्विकारले असून यापुढे ते नर्सच्या रुपात दिसणार आहेत. या नव्या रुपामागे काही कारस्थान आहे का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

वाचा : बॉलिवूडमधून अचानक गायब झालेली फाल्गुनी नवरात्रीत कमवते कोट्यवधी रुपये

आपल्या नव्या रुपाविषयी तावडे म्हणाले की, ‘परसू वेगळा वाटण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. त्याचं हसणं वेगळं, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी, किंवा त्याची लकबही वेगळी वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं मी हॉलिवूड अभिनेता हिथ लेजरच्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटातील जोकरच्या भूमिकेचा अभ्यास केला.’ ‘द डार्क नाईट’ मध्ये जोकरचा नर्सच्या वेशातील एक सीन प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
तावडे यांनी सोशल मीडियामध्ये नर्सच्या गेटअपमधली फोटो नुकताच शेअर केला आहे. नर्सचे कपडे, अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली असलेला हा फोटो आहे. या फोटोला त्यांच्या चाहत्यांची मोठी दाद मिळाली असून, हजारो लाईक्स मिळाले आहेत. कारस्थानी परसूनं गेटअप बदलून काहीतरी चाल खेळली आहे. आता या नर्सच्या गेटअपमागे काही नवी खेळी आहे का हे ‘दुहेरी’ मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये कळेलच.

वाचा : हे संवाद ऐकल्यावर ‘पार्टीशन १९४७’ चित्रपट पाहण्यास तुम्हीही व्हाल प्रवृत्त