आताच्या सोशल मीडियाच्या जगात फेसबुक, ट्विटर यांपासून दूर राहणे कठीण झाले आहे. फोटो शेअर करण्यापासून ते स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापर्यंत सोशल मीडियाचा वापर केला जातो. सोशल मीडियावर सक्रिय असणे ही जणू काळाची गरज झाले आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी ही गरज जाणून या माध्यमांचा वापर करू लागले आहेत. आपल्या चाहत्यांना सणांच्या शुभेच्छा देण्यापासून ते चित्रपटांची प्रसिद्धी करण्यापर्यंत ट्विटर, फेसबुकचा वापर केला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये शहेनशहा अमिताभ बच्चन, बादशहा शाहरुख खान यांचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स पाहावयास मिळतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कलाकारांमध्ये आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र म्हणजेच धरमपाजी यांचाही समावेश झाला आहे.

वाचा : ..म्हणून रियाला अचानक लग्न करावे लागले

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर पदार्पण केले असून, त्यांचे मुलगे आणि अभिनेते सनी आणि बॉबी देओल यांनी त्यांचे स्वागत केले. ८१ वर्षीय धर्मेंद्र यांनी गुरुवारी ट्विटरवर श्रीगणेशा केला. आगामी ‘यमला पगला दिवाना फिर से’ या चित्रपटाच्या सेटवरील दोन फोटो त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. त्यांनी फोटोसह ट्विट केलंय की, ‘यमला पगला दिवाना फिर से .. नवीन सुरुवात, शूट मोड, हैद्राबाद.’

सनी आणि बॉबीला त्याच्या वडिलांना मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर आणण्यास यश आल्याचे सनीने गुरुवारी ट्विट केलेले. ‘शोले’ फेम अभिनेता धर्मेंद्र यांना आतापर्यंत ३२७३ जणांनी फॉलो केले असून यात सनी, बॉबी आणि नातू करण देओल यांचाही समावेश आहे. ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाने करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

वाचा : श्रीदेवीच्या बर्थडेसाठी ऐश्वर्या, राणी आल्या एकत्र

‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वलचे सध्या हैद्राबाद येथे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटातून सनी आणि बॉबी ही भावांची जोडी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.