सनी लिओनी सध्या तिच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आपल्या व्यग्र कारभारातूनही ती सामाजिक भान राखत स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करायला विसरली नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे लोकांचे प्रबोधन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ती म्हणते. नुकताच सनीने ‘और दिखाओ’ या डिजीटल मीडिया वाहिनीसाठी एक व्हिडिओ शूट केला. यात तिने महिलांना एक अनोखा संदेश दिला आहे. पुरुष जेवढं महिलांच्या शरीराकडे बघतात तेवढं लक्ष महिलांनीही आपल्या शरीराकडे दिलं पाहिजे. आपल्या शरीरावर अधिक प्रेम करा त्याला जपा असे म्हणणारा हा व्हिडिओ ‘औरदिखाओ’ च्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
प्रिया बापटनेही या कॅम्पेनमध्ये आपली हजेरी लावली आहे. हा व्हिडिओ मराठीमध्येही शूट करण्यात आला आहे. दोन मिनिटं स्वतःसाठी अशी या व्हिडिओची टॅग लाइन आहे. यात तिने स्त्रियांनी त्यांच्या स्तनांकडे तेवढंच लक्ष दिलं, जेवढे पुरुष देतात तर स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतं असा संदेश दिला आहे.
भारतात ६० टक्के स्तनांच्या कर्करोग हा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात कळतो. पण एका छोट्या घरगुती चाचणीमुळे स्तनाचा कर्करोग आहे की नाही ते आपल्याला सहज कळू शकतं. यात लाजण्यासारखं, शरम वाटण्यासारखं आणि घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट यावर एकत्र येऊन जास्तीत जास्त चर्चा करायला हवी. स्तनांचा कर्करोग हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे आणि दोन मिनिटांची ही चाचणी आपलं आयुष्य बदलू शकते असे मेसेज देणारे हे व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल होत आहेत.
या कॅम्पेनसाठी तापसी पन्नू, सुनिधी चौहान, नीति आणि शक्ती मोहन, पुनम पांडे, प्रिया बापट, दिव्यांका त्रिपाठी, दिशा परमार, शरगुन मेहता आणि गौरव गेरा या कलाकारांनी आपली मतं व्हिडिओद्वारे मांडली आहेत.