काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ आणि अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी एक मुलगी दत्तक घेऊन तिचं पालकत्त्व स्वीकारलं होतं. सनीने या मुलीचे नाव निशा कौर वेबर असं ठेवलं. महाराष्ट्रातील लातूरच्या एका मुलीला दत्तक घेत सनीने आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केलीये, असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे टेस्टट्युब बेबी आणि सरोगसीचं प्रस्थ वाढत असताना सनीचा मुलगी दत्तक घेण्याच्या निर्णयाची सर्वच स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.

क्रिती सेनॉनबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

सनीचे चाहते जेवढे तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात तेवढीच उत्सुकता आता निशाबद्दलही निर्माण झाली आहे. सनीने दत्तक घेतलेल्या निशाचे आतापर्यंतचे आयुष्य ग्रामीण भागात गेले. २१ महिन्यांची निशा लातूरची असल्यामुळे तिला मराठीत बोललेलं थोडं फार कळतं. पण सनी आणि डॅनिअलला मराठी येत नसल्यामुळे तिच्याशी संवाद कसा साधायचा हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तसेच या दोघांचं इंग्रजी हे अस्खलित असल्यामुळे लहानग्या निशाला ते सध्यातरी कळत नाही. पण आता ती हळूहळू इंग्रजी शिकायला लागली आहे. ती सध्या मम्मी-पप्पा या शब्दांबरोबर ती आता बाय-बाय म्हणायलाही शिकली. सनी कामानिमित्त बाहेर जायला निघाली की, निशा तिला बाय-बाय करते. येत्या काळात निशाच्या लाइफस्टाइलमध्ये खूप बदल होईल यात काही शंका नाही.

निशाच्या येण्याने सनीच्या कुटुंबाचा त्रिकोण आता पूर्ण झाला असून आपल्या व्यग्र वेळापत्रकातून ही बेबी डॉल तिच्या आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या बेबी डॉलसोबत रमण्यात मग्न आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच सनी आणि डेनियलने भारत सरकार आणि सीएआरए यांच्याकडे मुलगी दत्तक घेण्यासाठी मागणी केली होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता होण्यास बराचसा वेळ लागल्याने निशाला आपल्या घरी नेण्यास सनीला थोडा उशीर झाला. पण आता सगळ्याच गोष्टींची पूर्तता झाली असून आज सनी, वेबर आणि निशा एकमेकांच्या सहवासात खूश आहेत.