‘इम्फा’ पुरस्कार सोहळय़ात मराठमोळय़ा अवतारात ठेका धरणार

’ ऊर्मिला, इशा, तनिशाही थिरकणार

दिलखेचक नृत्य, सूचक नजरबाण, कमनीय हालचाली आणि या साऱ्यांवर साज चढवणाऱ्या शब्दसंगीताची नशा यांमुळे लावणी हा नृत्यप्रकार रसिकांना ‘घायाळ’ करतो. पण याला मादक सौंदर्याची जोड लाभली तर रसिकांचे काय होईल?.. हाच अनुभव मराठी प्रेक्षकांना लवकरच घेता येणार आहे. मादक अभिनय आणि दिलखेचक अदाकारीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सनी लिओनी यंदाच्या इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्डस(इम्फा) सोहळय़ात  मराठमोळय़ा अवतारात मराठी गाण्यांवर ठेका धरताना दिसणार आहे. या सोहळय़ात सनी नेमक्या कोणत्या गाण्यावर नृत्य करणार हे अद्याप उघड करण्यात आले नसले तरी एखाद्या लावणीच्या तालावर तिची पावले थिरकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ सनीच नव्हे तर ऊर्मिला मार्तोडकर, ईशा कोप्पीकर आणि तनिशा मुखर्जी या बॉलिवूड अभिनेत्रीही मराठी गाण्यांवर आपल्या नृत्याचा साज चढवणार आहेत. युरोपच्या समुद्रात नॉर्वेजियन एपिक क्रूझवर होणारा हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या सनी लिओनीने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषत: ‘बेबी डॉल मै सोने दी’, ‘पिंक लिप्स’, ‘लैला’, ‘चार बोटल व्होडका’ अशा गाण्यांतील मादक नृत्याभिनयाबद्दल तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. मात्र, आता ‘इम्फा’ पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने सनी पहिल्यांदाच मराठमोळय़ा अवतारात मराठी गाण्यांवर नृत्य करताना दिसेल. ती कोणता नृत्यप्रकार सादर करेल, याबाबत अद्याप काही वाच्यता करण्यात आली नसली तरी सनीचा आजवरचा प्रवास पाहता ती लावणीच सादर करेल, अशी चर्चा रंगली आहे. अर्थात या सोहळय़ातून सनीचा ‘मराठी लूक’ पाहायला मिळणार हे निश्चित. या सोहळय़ातील नृत्याचा सराव करण्यात सनी सध्या व्यस्त असल्याचे सांगण्यात येते.

सनी लिओनीचे नृत्य हेच ‘इम्फा’ पुरस्कार सोहळय़ाचे प्रमुख आकर्षण नसून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी व अभिनेत्री काजोलची बहीण तनिशा मुखर्जी हीदेखील प्रथमच मराठमोळय़ा अवतारात या सोहळय़ातून पाहायला मिळेल. याशिवाय हिंदीसह मराठी पडद्यावरही झळकलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मार्तोडकर आणि ईशा कोप्पीकर यांचा नृत्याविष्कार या सोहळ्याचे आकर्षण आहे.