बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि डान्स यांचे नाते तर साऱ्यांनाच माहीत आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सुशांत डान्सर होता. अभिनेता झाल्यावर त्याने आपली डान्सची आवड वेळोवेळी जपली. आताही तो वेळ मिळेल तेव्हा डान्सचा सराव करताना दिसतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याच्या डान्सचे काही व्हिडिओ शेअर केले. यात त्याने म्हटले की, यापुढे तुमच्यासोबतही मी माझी आवड शेअर करेन. यानंतर त्याने त्याच्या अनेक डान्सचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्याच्या प्रत्येक व्हिडिओंना चाहत्यांनी भरभरुन कमेन्ट दिल्या आणि लाइक्सही केले. पण या सगळ्यात एक असा व्हिडिओ आहे ज्याची इतर व्हिडिओंपेक्षा अधिक चर्चा झाली. या व्हिडिओमध्ये सुशांतसोबत आहे श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस.

https://www.instagram.com/p/BZOka40A3NH/

‘ओके जानू’ सिनेमातील ‘हम्मा हम्मा’ या गाण्यावर हे दोघे थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओकडे पाहून कोणत्या तरी सोहळ्यासाठी या दोघांचा सराव सुरू आहे असे वाटते. या डान्समध्ये दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळते. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखाहूंनही अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाइक्सही केला आहे. सुशांतसाठी डान्स हा जेवढा जिव्हाळ्याचा विषय आहे तेवढाच जवळचा विषय जॅकलिनसाठीही आहे. तिच्या ए जेंटलमन या सिनेमात पोल डान्स शिकण्यासाठी तिने घेतलेली मेहनत तर साऱ्यांनाच माहिती आहे.

https://www.instagram.com/p/BZLLxX3A8e7/

सुशांतच्या जॅकलिनसोबतच्या व्हिडिओप्रमाणेच त्याचा शर्टलेस डान्स करतानाचा व्हिडिओही चाहत्यांना आवडला. यात त्याचे सिक्स पॅक अब्स दिसतात. त्याच्या प्रत्येक हालचालींवरुन तो किती लवचिक आहे याचा अंदाज येतो. करण जोहरच्या आगामी ‘ड्राइव्ह’ सिनेमात या दोघांची हटके जोडी दिसणार आहे. अजून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले नसून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.