भारतीय संघाचा कप्तान म्हणून लौकिक मिळवलेला महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत हे दोघेही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वावरत आहेत. ब्योमकेश चित्रपटानंतर एम. एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी या चरित्रपटात व्यग्र झालेल्या सुशांतला सध्या तरी धोनीशिवाय काहीही सुचत नाही आहे. अझरुद्दीनवरच्या चरित्रपटानंतर नीरज पांडे दिग्दíशत एम. एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी हा क्रिकेटपटूवरच्या जीवनावरचा दुसरा चित्रपट ठरणार आहे. लोकप्रिय खेळाडूवर आधारित चरित्रपट करणे ही किती अवघड गोष्ट आहे हे या चित्रपटाच्या निमित्ताने चांगलेच लक्षात आले, याची कबुली देणाऱ्या सुशांतने धोनी हा किती चांगला अभिनेता आहे याचाही शोध लागला असल्याचे सांगितले.

धोनीवरच्या चरित्रपटात काम करणे ही खूप अवघड गोष्ट होती, याचा पत्ता चित्रपटाच्या करारावर सहय़ा केल्या तेव्हाच लागला होता, असे सुशांतने सांगितले. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध आहे, त्याची स्वत:ची खेळण्याची शैली आहे. एखाद्या लोकप्रिय खेळाडूवरचा चित्रपट तेही तो लोकांसमोर असताना, खेळत असताना खूप काळजी घ्यावी लागते. तीन वेगवेगळ्या पद्धतीवर हे काम करावं लागतं, असं सुशांत म्हणतो. धोनीबद्दलचे अगदी सूक्ष्म तपशीलही अभ्यासावे लागले. कारण या बारीकसारीक गोष्टी असतील मग त्या त्याच्या स्वभावातील असतील, नाहीतर खेळातील असतील. या गोष्टींनीच त्याला इतकी वर्षे महान, चांगला खेळाडू म्हणून नाव कमावून दिलं आहे. त्यामुळे त्या तपशिलांवर मी भर दिला, असे त्याने सांगितले. एक अभिनेता म्हणून काल्पनिक व्यक्तिरेखा साकारणे तुलनेने सोपे असते कारण तिथे तुम्हाला तुमच्या विचाराचं काहीएक स्वातंत्र्य असतं. मी अभिनेता म्हणून धोनी पडद्यावर उत्तम साकारेनही पण जर तुम्हाला माझ्याकडे पाहून धोनीची आठवण झाली नाही तर ते पुन्हा माझं अपयश ठरेल, या इतक्या खोलवर विचाराने माझ्या दिग्दर्शकाने माझ्याकडून तयारी करून घेतली आहे, असे सांगणारा सुशांत याच चित्रपटामुळे धोनीही उत्तम अभिनेता असल्याचा साक्षात्कार आपल्याला झाल्याचे म्हटले आहे.

चित्रपटासाठी म्हणून एक खास जाहिरात आम्ही शूट केली. धोनीनेही आत्तापर्यंत किती तरी जाहिराती केल्या आहेत. मात्र या जाहिरातीत तो मला चिडवताना दिसतो. अभिनेत्याला काय चार ओळींचे संवादच तर म्हणायचे असतात असं चिडवत माझ्यात आणि त्याच्यात काही संवादांची झटपट देवाणघेवाण होते असं दाखवलं आहे. त्या वेळी धोनीने इतक्या सहजतेने संवाद म्हटले, माझ्या संवादावर त्याचे प्रतिसंवाद इतके पटापट आणि चांगले येत होते की मीही थक्क झालो होतो. त्या वेळी त्याच्यातली अभिनय कलाही तितकीच सुंदर असल्याचे मला जाणवले. मुळात तो जे काही ठरवतो त्यात तो उत्तम असतो, हा अनुभव आहे. त्यामुळे जर त्याने बॉलीवूडमध्ये यायचे ठरवले तर नक्कीच आम्हा कलाकारांनाही अन्य पर्यायांचा आत्तापासूनच विचार करावा लागेल, असेही त्याने मिस्कीलपणे सांगितले.

आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मेहनत सगळ्याच चित्रपटांवर घेतली आहे पण या चित्रपटासाठीचे प्रयत्नच पूर्णपणे वेगळे होते, असे त्याने सांगितले. मी धोनीचा खूप मोठा चाहता आहे. यानिमित्ताने सातत्याने त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. चित्रीकरणाआधी, नंतर.. कधी शॉटच्या दरम्यान किती तरी वेळा त्याला प्रश्न विचारण्याची आणि त्याच्याकडून अनेक गोष्टी समजून घेण्याचीही संधी मिळाली. या चित्रपटाने मला माणूस म्हणून जास्त समृद्ध केलं आणि ही गोष्ट चित्रपटानंतरही कायम माझ्याबरोबर राहील, असे सुशांतचे म्हणणे आहे. चरित्रपट आणि तोही लोकप्रिय खेळाडूवरचा म्हणजे वादांना खुले आमंत्रणच.. पण या चित्रपटात धोनीची कथा, ती सांगण्याची पद्धत जास्त महत्त्वाची आहे. आम्ही त्याच्या आयुष्यातील कुठलीही घटना, प्रसंग बढाचढाके सांगितलेले नाहीत. अत्यंत प्रामाणिकपणे त्याची गोष्ट सांगितली आहे त्यामुळे एम. एस. धोनी – अनटोल्ड स्टोरी हा एक उत्तम कथा-मांडणी असलेला चित्रपट ठरेल, असा विश्वास सुशांतने व्यक्त केला.

धोनीकडे खेळा इतकीच अभिनय कलाही सुंदर असल्याचे मला जाणवले. मुळात तो जे काही ठरवतो त्यात तो उत्तम असतो, हा अनुभव आहे. त्यामुळे जर त्याने बॉलीवूडमध्ये यायचे ठरवले तर नक्कीच आम्हा कलाकारांनाही अन्य पर्यायांचा आत्तापासूनच विचार करावा लागेल.

सुशांतसिंग राजपूत