सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसमध्ये स्पर्धकांनी पहिल्या दिवसांपासून आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेशाची संधी मिळालेल्या स्वामींचे खरे रुप समोर आले आहे. खुद्द स्वामींनीआपण ढोंगी असल्याचे कबुल केले. स्वामींच्या या वक्तव्यानंतर प्रियांका जग्गा, ‘स्वामी तुम्ही काय बोलत आहात, तुम्ही निर्मळ आहात..’ हे सांगताना दिसली. तुम्ही ढोंगी नाहीत असे आम्हाला वाटते, असे सांगायलाही प्रियांका विसरली नाही.

मात्र स्वामी आपल्या वक्तव्यावर ठाम होते. आपल्याला ढोंगी असल्याचे सांगताना त्यांनी आपण नव्या जमान्यातील मॉडर्न साधू असल्याची उपाधीही स्वतःला बहाल केली. ढोंगीपणाची सत्यता सांगितल्यानंतर स्वामींनीआपल्या देश सेवेची गाथा देखील ऐकवली. आपण केलेल्या देश संरक्षणाच्या कामगिरीवर लवकरच चित्रपटही प्रदर्शित होण्याचे सांगत स्वामीजींनी स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही धक्का दिला. हल्ली चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याआधीपासून त्याबाबत थोडी माहिती दिली जाते. स्वामींनी मात्र आपल्या चित्रपटाची माहितीच नव्हे तर चित्रपटाच्या नावाचा खुलासा करुन चित्रपट करमुक्त दाखविला जाणार असल्याची घोषणाच बिग बॉसच्या घरातून केली. आपल्या आयुष्यावर निघणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘ओम’ असल्याचे सांगत त्यांनी चित्रपट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेत निघणार असल्याचे सांगितले.

स्वामींवर ‘निष्ठा’ दाखविलेल्या प्रियांकानेदेखील स्पर्धेमध्ये आपल्याला विजय कोणासाठी मिळवायचा आहे, या विषयी खुलासा केला. आपल्या कुटुंबियांनी आपले कौतुकास पात्र होण्यासाठी मला स्पर्धा जिंकायची असल्याचे प्रियांकाने यावेळी सांगितले. दुसरीकडे नवीन आणि नतिभा यांच्यातही लढाई झाली.