अभिनेता स्वप्नील जोशीसाठी या वर्षीचा वाढदिवस खूप खास ठरला. वाढदिवसाच्या साचेबद्ध सेलिब्रेशनपासून काहीसा वेगळा विचार करत स्वप्नील जोशीने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वप्नीलने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दिले. ज्यानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड आणि स्वादुपिंड दान करणार आहे. त्याच्या आगामी ‘फुगे’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये स्वप्नीलने अवयवदानाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

चित्रपट वर्तुळामध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या स्वप्नीलचा हा निर्णय स्तुत्य आहे. याआधीही चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. समाजाप्रती आपुलकी आणि जबाबदारीची जाणीव पाहता कलाविश्वामध्ये या नव्या संकल्पना आता तग धरत आहेत.

दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच ‘फुगे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना जोशी-वाघमारे यांनी केले आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमुळे ‘फुगे’ या सिनेमाला प्रदर्शनाआधीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारी एस. टी. व्ही. नेटवर्क या निर्मिती संस्थेअंतर्गत प्रदर्शित होणारा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. शिवाय स्वप्नील आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या सिनेमाद्वारे जुळून आला असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी दुहेरी मेजवानी ठरणार आहे.

c902108e-854e-4dfc-b2fb-9e3ad896d941

a22ca906-8cd8-4c95-82d3-93c9d38da0c6

 

fa205be5-a3a3-4de3-8a51-76891a3b429c