बॉलिवूड बादशहा शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा अनेक अभिनेत्रींना असते. ‘अनारकली ऑफ आरा’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या स्वरा भास्करला देखील शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा आहे. स्वराला जेव्हा आनंद एल राय शाहरुखसोबत चित्रपट करणार असल्याची बातमी मिळाली त्यावेळी स्वराने दिग्दर्शक आनंद राय यांना शाहरुखसोबत चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळण्याबाबत विचारणा केली होती. यावर आनंद राय यांनी स्वराच्या स्वप्नांचा चक्का चुरा केला. शाहरुखच्या नायिकेच्या रुपात झळकण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्या स्वराला आनंद एल यांनी आगामी चित्रपटातील सर्व पात्रांची निवड झाली असल्याचे सांगितले. ही माहिती देताना ते स्वराला असेही म्हणाले की, चित्रपटात शाहरुखच्या आईची व्यक्तिरेखेची निवड अद्याप झालेली नाही. तुझी इच्छा असेल तर ही भूमिका मी तुला देऊ शकतो. आनंद राय यांच्या या प्रस्तावाने गोंधळून गेलेल्या स्वराने प्रस्ताव फेटाळून लावला.

यापूर्वी सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात स्वराने सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींनी सलमानच्या बहिणीची भूमिका करणे नाकारले होते, मात्र स्वराने सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाला होकार दिला होता. मात्र शाहरुखच्या आईची भूमिका साकारणे तिला फारच कठिण प्रस्ताव असल्याचे वाटले. त्यामुळेच तिने आनंद एल राय यांचा प्रस्ताव विनोदी पद्धतीने घेतला. स्वरा भास्कर आगामी ‘अनारकली ऑफ आरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले.

या चित्रपटात  स्वरा फारच बोल्ड आणि आत्मविश्वास असलेली मुलगी दाखवण्यात आली आहे. स्वराचा ‘अनारकली ऑफ आरा’ हा चित्रपट येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अविनाश दासचे दिग्दर्शन असेलेल्या या चित्रपटात स्वरासोबत पंकड त्रिपाठी आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाहरुख खान दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला असून या आगामी चित्रपटामध्ये तो एका वेगळी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुखची फक्त भूमिकाच नव्हे तर नायिका देखील वेगळी असणार आहे. आनंद राय यांच्या आगामी चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ याची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राय यांनी या आघाडींच्या अभिनेत्रींना डावलून सोनम कपूरला पसंती दिल्याचे समजते. या चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास सोनमसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. काही दिवसांपूर्वीच सोनमने एका मुलाखतीमध्ये शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटात स्वराची निराश करुन आनंद कोणाला शाहरुखची नायिका म्हणून निवड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.