अभिनेत्री तापसी पन्नू ‘पिंक’ चित्रपटातील अभिनयाने चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनयाने लाखोंच्या गळ्यातील ताईत बनलेल्या तापसीने आपल्या कर्मचाऱ्याला असे काही गिफ्ट दिले की, तिचा आदर्श इतर कलाकारांनी देखील घ्यावा. तापसीचा हा स्वभाव फक्त बॉलिवूडकरांसमोरच नाही तर मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये आदर्शाचा एक मानबिंदू दाखविणारा आहे. तापसीने तिच्यासोबत काम करणाऱ्या स्पॉटबॉयला सिंगापूरला सुट्टीसाठी पाठवून मालक आणि कर्मचारी यातला दुरावा कमी करण्याचा प्रयत्नच केलाय असे म्हणावे लागेल. कलाकारांसोबत काम करणाऱ्या मंडळींची अनेकदा उदाहरण समोर येत असतात. फॅशनेबल आणि आपल्याच तोऱ्यात असणारी मंडळी आपल्यासोबत काम करणाऱ्यांची फारशी दखल घेत असतील का? असा प्रश्न  काहिंच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल. यासारख्या प्रश्नावर तापसीने एक आदर्शच घालून दिल्याचे दिसते.तिने आपल्या स्पॉटबॉयला सुट्टीसाठी चक्क सिंगापूरला जाण्याचा खर्च उचलून मालक आणि नोकर यांच्यातील दरी नसल्याचे दाखवून दिले. कलाकाराला जशी आनंदात सुट्टी घालविण्याची हौस असते, अगदी तसेच आपल्यासोबत काम करणाऱ्या  नोकर-चाकरांना देखील आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा तो हक्क त्यांना मिळायला हवा, असे तापसी मानते. त्यामुळेच तिने स्व:खर्चाने स्पॉटबॉयला सिंगापूरला सुट्टीसाठी पाठविले. हा स्पॉटबॉय तापसीसोबत तब्बल ६ वर्षे काम करतो आहे.

तापसीला जेव्हा एका मुलाखतीमध्ये याबाबत विचारण्यात आले, त्यावेळी तिने दिलेले उत्तर हे तिच्यातील माणूसकीची दर्शन घडविणारे होते. स्पॉटबॉयला रोजच्या कामातून येणारा थकवा घालविण्यासाठी सुट्टी देणे गरजेचे आहे. ही सुट्टी देताना त्याला पूर्ण आराम मिळेल याची काळजी घ्यायला हवी, असे तापसीने सांगितले. एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीपेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नसते, असेही ती म्हणाली. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी आपल्यासोबत काम करणाऱ्यांनी अशी वागणूनक द्यावी, याचा संदेशच तापसीने तिच्या वर्तनातून दाखवून दिला आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी आलेल्या ‘पिंक’ चित्रपटाने अभिनेत्री तापसी पन्नूला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर भलेही तिचा कोणताच नवा चित्रपट आला नसला तरी तापसी ब-यापैकी चर्चेत राहिली आहे. तिच्या अभिनयाची हर पद्धतीने प्रशंसा करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणावर चर्चा करणा-या पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सध्या ती उपस्थिती लावत असल्याचे दिसते. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आगामी ‘नाम शबाना’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती गुप्तहेराची चित्तथरारक भूमिका साकारताना दिसणार आहे.