सोशल मीडियावर सक्रिय असणारे अमिताभ बच्चन विविध विषयांवर, संवेदनशील मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे संदेश देण्यासाठी नेहमीच ट्विट करत असतात. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ट्विटरवर त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये खुद्द बिग बींसह चित्रपटाच्या टीममधील सर्व पुरुष मंडळी दिसत असून, एकही अभिनेत्री झळकत नसल्याने बऱ्याच ट्विटर युजर्सनी बिग बींच्या या ट्विटविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर ‘पिंक’मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

‘मला १०० टक्के माहीत आहे की त्यांनी हे जाणूनबुजून केलं नसेल. आम्ही नसलेला फोटो त्यांनी जाणीवपूर्वक निवडला असेल असं होऊ शकत नाही. इतकंच नव्हे तर प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात त्यांनी आम्हा तिघींचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यामुळे हेतूपूर्वक त्यांनी तसा फोटो अपलोड केला असेल असं मला वाटत नाही,’ असं म्हणत तापसीने बिग बींची बाजू घेतली.

‘पिंक गर्ल्स कुठे आहेत?’, असा प्रश्न एका युजरने केला. तर दुसऱ्या एकाने ‘स्वत:च्या बळावर लढा जिंकलेल्या त्या मुली आहेत तरी कुठे? कृपया त्यांच्यासह हा फोटो रिपोस्ट करावा’, असं म्हटलं. तर काही युजर्सनी ‘या ट्विटमुळे एक चुकीचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचतोय’ असं म्हणत बच्चन यांना पेचात पाडलं होतं.

वाचा : ‘सेन्सॉरची कात्री आजही चालते, पण आता कोणीच काही बोलत नाही’

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक-समीक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतकंच नव्हे तर सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही ‘पिंक’ने पटकावला.