बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आगामी ‘नाम शबाना’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती चित्तथरारक भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटामध्ये तापसी एका गुप्तहेराची भूमिका साकरत आहे. यापूर्वी अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटामध्ये तापसी पन्नू या प्रकारची भूमिका करताना दिसली होती. त्यामुळेच तापसीचा आगामी चित्रपट स्पिन ऑफ असल्याची चर्चा आहे. एखाद्या चित्रपटातील व्यक्तिरेखेवर लिहिलेल्या कथानकावर आधारित चित्रपटाला स्पिन ऑफ चित्रपट असे म्हणतात. ‘बेबी’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात तापसीनेही काम केले होते. ‘बेबी’ चित्रपटामध्ये अक्षयच्या काठमांडूमधील मिशनवरील कथानकात तापसी छोट्याशा भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटात दिसली नाही. तिने साकारलेल्या त्या व्यक्तिरेखेवर आधारित कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, तापसीच्या आगामी चित्रपटाविषयी बोलताना अक्षय म्हणाला की, मिशनवर आधारित अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. मात्र या चित्रपटाचे कथानक इतर चित्रपटांपेक्षा वेगळे आहे. या चित्रपटामध्ये गुप्तहेर कसे बनविले जातात ते दाखविण्यात येणार आहे. यावेळी अक्षय कुमारने ‘पिंक’ चित्रपटातील भूमिकेची आठवण करुन देत तापसी परिपक्व अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. मी तिला ‘बेबी’ चित्रपटामध्ये अॅक्शन सीन करताना पाहिले आहे. ‘बेबी’ चित्रपटातील अभिनयाने तापसीने मला प्रभावित केले होते. या चित्रपटात तापसीने साकारलेली शबानाची भूमिका ‘नाम शबाना’ चित्रपटासाठी प्रेरणादायी असल्याचे अक्षय कुमारने एका मुलातीमध्ये म्हटले आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी तापसीने खिलाडी अक्षय कुमारने मार्गदर्शन घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच तापसी पन्नू हिच्या आगामी ‘नाम शबाना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन मिनिट १२ सेकंदाच्या या व्हिडिओत  तापसी पन्नू व्यतिरीक्त बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी आणि डॅनी डेंजोग्पा यांची देखील झलक पाहावयास मिळते. ट्रेलरच्या आधी या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. दिग्दर्शक नीरज पांड्ये हा सत्य घटनांवर आधारित कथानक लिहण्यासाठी ओळखला जातो. नीरजने आतापर्यंत ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’ आणि काही महिन्यांपूर्वीच आलेल्या ब्लॉकबस्टर ‘एमएस धोनी..’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. या पंक्तीत आता नीरजचा आगामी चित्रपट ‘नाम शबाना’ हा समाविष्ट झाला आहे. नीरजच्या युनिटमध्ये असलेल्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘नाम शबाना’ हा चित्रपट शबाना नामक अंडरवर्कर महिला एजंटच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट ३१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.