चित्रपट वर्तुळात दर दिवसाआड अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ची बातमी चर्चेचा विषय ठरत आहे. सिनेरसिकांना एका थरारक काळाची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाबाबत बॉलीवुडमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत असून बी टाउनचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारत आहे. प्रेम, वैर, सूड, देशभक्ती अशा चौफेर विषयांना हात घालणाऱ्या ‘रुस्तम’च्या पोस्टर्सपासून त्याचा रेडिओ ट्रेलर, ट्रेलर सध्या प्रचंड गाजत आहे. सिनेमाचा प्रदर्शित ट्रेलर आणि गाणे चाहत्यांना भुरळ घालत असतानाच चित्रपटाचे आणखीन एक गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. मनोज मुंतशिर लिखित ‘तय है..’ असे बोल असणाऱ्या गाण्यात इलियाना डिक्रूझ आणि खिलाडी कुमार यांच्यातला रोमान्स पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. अतिशय सुंदर चित्रीकरण असलेले हे गाणे बॉलीवुडमधला सुप्रसिद्ध गायक अंकित तिवारीने गायले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच अक्षय आणि इलियाना या दोघांनीही त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन याबद्दलची माहिती दिली होती. ‘एअरलिफ्ट’ मधून एका संवेदनशील भारतीयाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा खिलाडी कुमार ‘रुस्तम’ या चित्रपटातून रुस्तम पावरी या नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या गाण्याच्या निमित्ताने ‘बॉलिवूड’मध्ये आणखीन एका ‘ऑनस्क्रिन कपल’ ची भर पडली आहे हे नक्कीच. प्रेमापलीकडे जात ‘कोर्टरुम ड्रामा’चा नाट्यमय प्रवास पाहण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे.
१९५९ च्या काळतील बहुचर्चित नानावटी केसवर आधारलेल्या कथानकाचे चित्रण या चित्रपटात पाहता येणार आहे. ‘गब्बर इज बॅक’, ‘बेबी’ यांसारख्या चित्रपटांतून विशिष्ट धाटणीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ आणि ऐतिहासिक काळावर आधारलेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदाडो’ या दोन्ही चित्रपटांची टक्कर येणाऱ्या काळात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये असणारी ‘रुस्तम’ची उत्सुकता पाहता इलियाना डिक्रूझच्या चित्रपट कारकिर्दीत हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावणार गे नक्कीच.