‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या मित्रासोबत ‘हॅंगआऊट’ करते आहे. अंकिताचा हा नवा मित्र आहे टेलिव्हिजन अभिनेता कुशल टंडन. या दोन्ही कलाकारांचं नातं पाहता बरेचजण ‘कुछ तो गडबड है….’ असं म्हटल्यावाचून राहणार नाहीत. अंकिता आणि कुशल या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला असला, तरीही त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता अनेकांनी स्वतःचे तर्क लावण्यास सुरुवात केलीये.

कुशल – अंकिता या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेले फोटो पाहता त्यांच्या मैत्रीच्या नात्यामध्ये आणखी एक नातं खुलत असल्याचं लक्षात येत. कुशल सोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये अंकिताने ‘नकळत जुळलेलं मैत्रीचं नातं खूप खास असतं..’ असं कॅप्शन दिलं आहे. आता तिच्या या कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘अनएक्सपेक्टेड फ्रेंडशिप’ म्हणजे नेमकं काय, असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

अंकिता- कुशलचे हे फोटोच नव्हे, तर काही व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. रोजच्या चित्रीकरणाच्या व्यापातून वेळ काढत या कलाकारांचा ‘टाइमपास’ सध्या टेलिव्हिजन वर्तुळातही चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकी मैत्री आहे की आणखी काही, हे येत्या काळात कळेल असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अंकिताचं नाव आता कुशलसोबत जोडलं जात आहे. कुशलही अभिनेत्री गौहर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कलाकारांचे ब्रेकअप, पॅचअप ही गोष्ट काही नवीन नसली तरीही अगदी अनपेक्षितपणे दोन कलाकारांची नावं एकत्र जोडली जाऊ लागल्यावर कोणत्या प्रकारच्या चर्चांना उधाण येतं याचाच प्रत्यय सध्या अंकिता- कुशलचे फोटो पाहून येत आहे.

वाचा: बॉलिवूड स्टार्सपेक्षा जास्त कमवतात हे टीव्ही कलाकार