'दिया और बाती हम' या मालिकेतली अभिनेत्री दीपिका सिंग सध्या वेगळ्याच धक्यात आहे. ती लवकरच आई होणार आहे. हा धक्का तिच्यासाठी आनंदाचाच आहे. त्यामुळे सध्या ती तिचे गरोदरपण चांगलेच एन्जॉय करताना दिसत आहे. 'मला फार आनंद होत आहे. माझ्यासाठी एका नवीन पर्वाची सुरुवात झाल्यासारखेच मला वाटते. मी माझ्या तब्येतीची आणि डाएटची फार काळजी घेत आहे. एकवेळ अशी होती जेव्ह मी उड्या मारतच चालायचे पण आता मी एक एक पाऊल जपून टाकते. अर्थात हा एक चांगला बदल आहे. माझ्यावर एक जवाबदारी असल्याचे मला जाणवते. एवढी वर्ष जे मी आरोग्यासाठी योगा आणि व्यायाम करत आले त्याचा मला आता उपयोग होत आहे.' तसेच दीपिकाने पुढे म्हटले की, 'मला माझ्यावरच विश्वास बसत नाही की, मी प्रेग्नन्सी टेस्ट किटवर येणाऱ्या सुचना कित्येकदा वाचल्या. मी फक्त सिनेमा आणि टीव्ही मालिकेत प्रेग्नन्सी टेस्ट करताना पाहिले होते. पण मी जेव्हा ही टेस्ट करत होते तेव्हा अंगावर काटा आला होता.' सध्या दीपिका घरी आराम करणे पसंत करत आहे. सध्या मी गरोदरपणात वाचण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तकं वाचत आहे. मला वाचन करायला आवडते पण गेल्या पाच वर्षात मी संहितेशिवाय दुसरे काही वाचलेच नाही. दरम्यान, दिया और बाती हम या गाजलेल्या कार्यक्रमामध्ये दीपिकाने ‘संध्या राठी’ ही व्यक्तीरेखा साकारत होती. या भूमिकेद्वारे तिने प्रेक्षकांच्या मनावरही चांगलीच छाप पाडली होती. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद झाली खरी. पण, या मालिकेबद्दलच्या विविध चर्चा मात्र रंगू लागल्या. दीपिकाची तब्बल १.१४ कोटी रुपयांची रक्कम निर्मात्यांकडे बाकी आहे. ज्यापैकी ९० लाख रुपये तिच्या अभिनयाचा मोबदला आहे आणि २४ लाख रुपये व्याजाचे आहेत. ही इतकी रक्कम देण्याची थकलेली असतानाच निर्मात्यांनी आता दीपिकावरच उलटफेर साधत तिच्याकडूनच १६ लाख रुपयांची मागणी केली आहे.