‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री हिना खान सध्या ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमातून एका वेगळ्याच रुपात सर्वांसमोर आली. सध्या टेलिव्हिजनची ही ‘संस्कारी बहू’ या रिअॅलिटी शोमध्ये थरारक स्टंट करताना दिसतेय. त्यामुळे सोशल मीडियावरही तिची अनेकांनीच प्रशंसा केली आहे. लवकरच या रिअॅलिटी शोची उपांत्य फेरी पार पडणार आहे. मुख्य म्हणजे या उपांत्य फेरीमध्ये काही ट्विस्टही पाहायला मिळतील.

‘खतरों के खिलाडी’च्या उपांत्य फेरीमध्ये स्पर्धकांसोबतच एक जोडीदार असणार आहे. या जोडीदाराला स्पर्धकांच्या सोबत असलेल्या स्टंट करावा लागणार आहे. अशा या हटके संकल्पनेमध्ये टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध जोडी अभिनेता रवी दुबे आणि त्याची पत्नी सरगुन मेहतासुद्धा उपस्थित असणार आहेत. त्यासोबतच सर्वांची लाडकी ‘अक्षरा बहू’ म्हणजेच अभिनेत्री हिना खानसुद्धा तिच्या प्रियकरासोबत दिसणार असल्याची चर्चा आहे.

या शोच्या एका प्रोमोत दाखवल्यानुसार हिनाचा प्रियकर रॉकी जैसवाल तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन येतो. त्यांचं नातं पाहता या शोच्या माध्यमातूनच सर्वांसमोर हिना तिच्या प्रेमाची कबुली देणार असल्याचं म्हटलं जात आहे. रॉकी आणि हिना बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून सोशल मीडियावरही ते दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे आता फक्त सोशल मीडियापुरताच सीमित न राहता हे दोघंही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतात का, याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माने अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. तेव्हा आता तिला टक्कर देण्यासाठी कोणत्या सेलिब्रिटींना संधी मिळते यावरही अनेकांचं लक्ष आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हिना खान, रवि दुबे, शांतनू महेश्वरी, लोपा यांच्यात स्पर्धा असणार आहे.