टेलिव्हिजन विश्वात एकेकाळी अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखले जायचे. ‘दिल मिल गये’ या मालिकेच्या सेटवरच या दोघांचं प्रेम बहरलं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. पण, करण आणि जेनिफरचा संसार फार दिवस टिकू शकला नाही. काही महिन्यांतच या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि करणने त्याच्यासाठी वेगळ्या जोडीदाराची निवड केली. जेनिफरसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केलं. सध्या हे दोघंही सुखाचा संसार करत आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट पाहता ही बाब लगेलच लक्षात येते. पण, जेनिफरच्या चाहत्यांना मात्र या ‘मंकी कपल’च एकत्र येणं फारसं रुचलं नाही.

करण आणि बिपाशा नेहमीच विविध ठिकाणांना भेट देत असतात. त्यासंबंधीचे काही फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट केले आहेत. पण, करणने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्याच्यावर बऱ्याचजणांनी नाराजीचा सूर आळवला आहे. ‘यूके’ सफरीमधील एक फोटो पोस्ट करत करणने त्याला साजेसं कॅप्शनही दिलं. विलियम शेक्सपियरच्या जन्मस्थळी येण्याचा आनंद त्याने या कॅप्शनमधून व्यक्त केला. यासोबतच बिपाशाची साथ मिळालेले हे क्षण अतिशय सुंदर असल्याचंही त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

करण आणि बिपाशाचं एकत्र येणं, फोटो पोस्ट करणे फॅन्सना रुचलं नाही आणि त्यांनी या फोटोच्या कमेंटबॉक्समध्ये नाराजी व्यक्त केली. करणचं हे तिसरं लग्न असल्यामुळे काही युजर्सनी तर या गोष्टीवरही प्रकाश टाकला. ‘काही दिवसांनी हा त्याच्या चौथ्या पत्नीबद्दलही असंच म्हणेल’, असं एका युजरने लिहिलं. ‘तू जेनिफरला का सोडलंस?’ असा प्रश्नही काही युजर्सनी उपस्थित केला. तर, ‘तुमची जोडी बनावट दिसते’ असं म्हणतही नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. करण आणि बिपाशाच्या ‘इन्स्टा हँडल’ला काही नेटिझन्सनी त्यांच्या कमेंटमध्ये मेंशनही केलं आहे. त्यामुळे आता या कमेंट्स थेट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. चाहत्यांच्या अशा द्वेषपूर्ण कमेंट्स वाचून हे ‘मंकी कपल’ याविषयी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.