‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे रिअॅलिटी शोची संकल्पनाच पूर्णपणे बदलली. टेलिव्हिजन विश्वात या कार्यक्रमाशी प्रेक्षकही अशा प्रकारे जोडले गेले की, हा कार्यक्रम त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन गेला. सर्वसामान्यांतून करोडपती होण्यापर्यंतची अनेकांची इच्छा या कार्यक्रमातून पूर्ण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन यांची. बिग बी अमिताभ यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतल्यामुळे त्याचा प्रचंड फायदा कार्यक्रमाच्या टीआरपीला झाला.

पण, कार्यक्रमाची लोकप्रियता वाढवण्याच्या नादात बिग बींच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष झाले असून, आता त्यांना या साऱ्याचा त्रास होऊ लागला आहे. व्यस्त वेळापत्रक आणि सततच्या वेळापत्रकामुळे आपल्या कंठाला (स्वरयंत्र) याचा त्रास होऊ लागल्याचं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. ‘केबीसी’च्या चित्रीकरणामध्ये सलग बोलत राहिल्यामुळे त्यांच्या घशामध्ये संसर्ग झाला असून, यामुळे काहीही खाताना त्यांना फार त्रास होत असल्याचे कळते आहे.

आपण योग्य तो औषधोपचार सुरु केले असून, ‘केबीसी’च्या अंतिम भागाचे चित्रीकरण लवकरच पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी ब्लॉगमध्ये स्पष्ट केले. येत्या काळात काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर बिग बी पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करतील. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे नववे पर्व आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. हा कार्यक्रम जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असला तरीही बिग बी मात्र एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा