अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरीही तिच्या ऑडिओ चॅट शोमुळे बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोचा यंदाचा सीझन सध्या संपण्याच्या मार्गावर असून वरुण धवन, सनी लिओनी, ऋषी कपूर यांच्या मागोमाग आता आणखी एका प्रसिद्ध चेहऱ्याने तिच्या या कार्यक्रमात हजेरी लावली. टेनिसपटू सानिया मिर्झा हिने नुकतंच नेहाच्या कार्यक्रमात येत दिलखुलास गप्पा मारल्या. नेहाने यासंबंधीचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत सानियाचा ‘नो फिल्टर’ अंदाज सर्वांसमोर आणला.

टेनिस कोर्टवर आपल्या खेळाने चाहत्यांची दाद मिळवणारी सानिया या अंदाजातही अनेकांचे लक्ष वेधत आहे. सानियाला सर्वात जास्त वेड कोणत्या गोष्टीचं आहे, असा प्रश्न विचारला तर अनेकांच्याच तोंडून टेनिसचं नाव येईल. पण, सानियाला आणखी एका गोष्टीने वेड लावलं होतं. ती अनपेक्षित गोष्ट होती ‘बालिका वधू’ ही मालिका. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका सानियाचीसुद्धा फार आवडती होती. तिला या मालिकेने इतकं वेड लावलं होतं की, विम्बल्डनमधूनही ती आईला फोन करुन मालिकेविषयी चौकशी करायची.

२००८ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या कार्यक्रमाविषयी सांगताना सानिया म्हणाली, “मला तो कार्यक्रम फार आवडायचा. हे पाहून मला बहिणीनेही विचारलं होतं की, ‘विम्बल्डनमध्ये जाऊन तू तिथे हा कार्यक्रम पाहणार आहेस का?’, त्यावर मी तिला उत्तर द्यायचे, ‘हे बघ मला तो कार्यक्रम आवडायचा. पण, आता तो मला फारसा आवडत नाही. तरीही आईसोबत मी जेव्हा जेव्हा असायचे तेव्हा त्या कार्यक्रमाविषयी, कथानक नेमकं कसं वळण घेतंय याविषयी आमचं बोलणं व्हायचं. त्यामुळे साहजिकच त्या गोष्टीविषयी माझ्या मनात पुन्हा कुतूहल जागं झालं. आईशी फोनवरुन संवाद साधतानासुद्धा मी आनंदीचं काय झालं’, असं आवर्जून विचारायचे’.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

नेहासोबत गप्पा मारताना सानियाच्या आवडत्या मालिकेविषयी अशी माहिती सर्वांसमोर आल्यामुळे अनेकांसाठी ही आश्चर्याचीच बाब आहे. तिच्याविषयी आणखीही अशा बऱ्याच गोष्टी या गप्पांमध्ये उघड झाल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी नेहा आणि सानियाच्या ‘नो फिल्टर’ गप्पा ऐकण्यावाचून दुसरा पर्याय नाही.