बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निकटवर्तिय अनिता अडवानी यांना न्यायव्यवस्थेकडून काहीसा सुटकेचा नि:श्वास मिळाला असल्याने, त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. राजेश खन्ना यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये अनिता या त्यांच्या खूप जवळ होत्या. अनिता अडवानी यांना राजेश खन्ना यांच्या मृत्युपत्राची प्रत देण्यात यावी असे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मृत्युपत्राच्या वादावर दिले. याविषयीच्या आपल्या भावना एका वृत्तसंस्थेजवळ व्यक्त करताना त्या म्हणाल्या, मी न्यायव्यवस्थेची शतश: आभारी आहे. मी त्यांना मनासापून धन्यवाद देते. तिसऱ्यांदा माझ्याबाजूने निकाल लागला आहे. मला बुधवारी ही आनंदाची बातमी समजली. मृत्यूपत्राची प्रत मिळाल्यावर, मी पुढील वाटचालीबाबत विचार करेन.
१८ जुलै २०१२ राजी राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला. मृत्युपत्रानूसार ट्विंकल आणि रिंकी या त्यांच्या दोन मुली कायदेशीर वारसदार आहेत. नुकतेच राजेश खन्ना यांच्या आशिर्वाद बंगल्याची ९० कोटी रुपयांना विक्री झाल्याचे वृत्त माध्यमात प्रसिध्द झाले होते. या व्यवहाराला अनिता अडवानींकडून आव्हान देण्यात आल्याचे समजते. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, बंगल्याच्या विक्रीला मी आव्हान दिले असून, या बंगल्याचे संग्रहालयात रुपांतर करण्याची माझी इच्छा आहे. हे माझे आणि काकाजींचे (राजेश खन्ना) स्वप्न होते, तेव्हा काय होते ते पाहूया. या बंगल्यासाठी ९० कोटी किंमत ही कवडी मोल आहेत. हा बंगला अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असून, याची किंमत खूप जास्त असल्याचे, त्या म्हणाल्या.