अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती आपल्या मैत्रिणींसोबत एका लंच पार्टीला गेली होती. तेव्हा तिथे तिने बीफ खाल्ल्याचे समोर आलेय. भारतात गोमांस (बीफ) बंदी असल्यामुळे नेटिझन्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणामुळे वाद होण्याची चिन्हं पाहता काजोलने ट्विट करून तिची बाजू मांडली आहे.

काजोलने ट्विट केलंय की, ‘माझ्या मैत्रिणींसोबत मी बीफ खात असल्याचे एका व्हिडिओत म्हटले गेले आहे. त्यात बोलण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. ते बीफ नव्हतंच. व्हिडिओत जी डीश दाखविण्यात आलेली ते म्हशीचं मटण होतं आणि हे खाण्यास कायदेशीर परवानगी आहे. हा एक संवेदनशील मुद्दा असल्यामुळेच मी हे स्पष्टीकरण देतेय. यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.’

वाचा : काजोलची बीफ पार्टी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

काजोलने दिलेल्या स्पष्टीकरणावर अभिनेता अनुपम खेर यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांनी काजोलच्या ट्विटर प्रतिक्रिया देत तिची बाजू घेतली. त्यांनी लिहिलंय की, ‘डिअर काजोल नमस्ते. बेटा तू सांगून का टाकत नाही की ती देसी गोमाता नव्हती. पनामा येथून ते खासकरून मागवलं होतं. भक्तांना ते खरं वाटेल. ते म्हशीचं मटण होत, जर तू खरं बोलत असशील तर लोक तुला नक्कीच पाठिंबा देतील. हेच दिवस बघण्यासाठी तुझं राजसोबत लग्न लावलं होतं?’, असा खोडकर प्रश्नही त्यांनी काजोलला केलाय. ‘असो, स्पष्टीकरण देणंही गरजेचं आहे. नाहीतर वेडे भक्तगण तलवारी घेऊन घरी येतील. काळजी घे बेटा,’ असेही पुढे त्यांनी म्हटलेय.

काजोल आणि तिच्या मैत्रिणी रविवारी मित्र रेयानच्या घरी लंच पार्टीला गेल्या होत्या. या पार्टीचा लाइव्ह व्हिडिओ काजोलने फेसबुकवर चालवला होता. ‘माझ्या मित्राने आजच्या पार्टीसाठी खास डीश तयार केली आहे’, असे म्हणत तिने ती डीशही व्हिडिओत दाखवली होती. त्यानंतर तिच्या मित्रानेच ते बीफ असल्याचं व्हिडिओत म्हटलं. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर अधिकाधिक व्हायरल होऊ लागला. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून काही नेटिझन्सनी काजोलची खिल्ली उडवली तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता काजोलने लगेच तो व्हिडिओ काढून टाकला. पण, तोपर्यंत अनेकजणांनी तिचा व्हिडिओ शेअर केलेला.

काजोलच्या ट्विटनंतर आता हे प्रकरण शांत होतंय की यामुळे आणखी कोणता मोठा वाद उद्भवतोय हे लवकरच कळेल.