‘फॅण्टम’ या हिंदी चित्रपटातील वेगळ्या भूमिकेला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे बॉलीवूडचा हिरो सैफ अली खानची भावना ‘फॅण्टम’ खूश हुआ! अशी झाली आहे. आपल्या भविष्यातील कारकीर्दीसाठीही या भूमिकेचा फायदा होण्याची शक्यता असल्याचे सैफला वाटते. ‘फॅण्टम’मधील या वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षक आणि अन्य निर्माते व दिग्दर्शक यापुढे आपल्यासाठी काही वेगळ्या भूमिका घेऊन येतील, असा विश्वासही सैफ याला वाटतो.
बॉलीवूडच्या चित्रपटात एखाद्या अभिनेत्याची विशिष्ट प्रतिमा तयार झाली की त्यातून बाहेर पडणे त्याला कठीण जाते. हिंदी चित्रपटात नेहमीच ‘लव्हर बॉय’ अशी प्रतिमा जपलेल्या सैफची ‘फॅण्टम’मध्ये एकदम वेगळी भूमिका आहे. त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करण्याचा एक कलाकार म्हणून कंटाळा येतो. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका मिळाली तर काम करण्यात एक वेगळा आनंद मिळतो, असे सैफचे म्हणणे आहे.‘फॅण्टम’मध्ये सैफ अली खान पहिल्यांदा त्याच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या ‘भूमिके’त प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ‘दिल चाहता है’मध्ये सैफने विनोदी नायक, तर ‘हम तुम’ चित्रपटात तो ‘रोमॅण्टिक हिरो’ होता. ‘ओमकारा’ व ‘एक हसिना थी’ चित्रपटांत त्याने खलनायक साकारला होता.