प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा सध्या कठीण काळातून जात आहे. नेहमी आपल्या विनोदबुद्धीमुळे प्रसिद्ध असणारा कपिल आता सुनील आणि त्याच्यात झालेल्या वादामुळे बराच चर्चेत आला.

मेलबर्न येथून मुंबईला येत असताना विमान प्रवासात कपिल शर्मा आणि त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘डॉ मशहूर गुलाटी’ची भूमिका साकारणारा सुनील ग्रोवर यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादादरम्यान कपिलने रागात सुनीलवर शूज फेकून मारल्याचेही म्हटले जात होते. या सर्व प्रकारामुळे सुनील बराच दुखावला असून, त्याने गेल्या आठवड्यापासून शोच्या शूटिंगला हजेरी लावलेली नाही. त्याच्यासोबत या शोमधील इतर कलाकार म्हणजेच अली असगर आणि चंदन प्रभाकर हेदेखील शूटिंगसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे या तिघांच्या जागी राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांना शेवटच्या क्षणी आणण्यात आले. मात्र, या तिघांची हवीतशी जादू प्रेक्षकांवर चालली नाही.

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार या वादानंतर गेल्या आठवड्यात कपिल शर्माच्या शोमध्ये ‘नाम शबाना’ चित्रपटाची टीम प्रसिद्धीसाठी आली होती. या टीमसोबत शूटींग केल्यानंतर पॅकअप झाल्यावर कपिलला रडू कोसळल्याचे म्हटले जातेय. ‘नाम शबाना’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता मनोज बायपेयीसमोर कपिलला त्याचे अश्रू अनावर झाले. तसेच, आपल्या वागण्याबद्दल दुःख वाटत असल्याचेही त्याने यावेळी व्यक्त केले. आपल्या तीन महत्त्वाच्या सहकलाकारांशिवाय कपिलला तापसी पन्नू आणि मनोज बाजपेयीसोबत शूट करावे लागले होते.

दरम्यान, सुनील ‘द कपिल शर्मा शो’ सोडला की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सुनील लवकरच त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एका वेगळ्या माध्यमातून समोर येणार आहे. कपिलशिवाय सुनील ग्रोवर कॉमेडीच्या मैदानात उतरणार असून, तो दिल्लीत एक लाइव्ह शो करणार आहे. दिल्लीतील कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्याने फेसबुकवरुन कार्यक्रमाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘डॉ. मशहूर गुलाटीज कॉमेडी क्लिनिक’ हा लाइव्ह शो तो करणार असून, यात त्याच्यासोबत किकू शारदादेखील काम करणार आहे. कपिलसोबत झालेल्या वादानंतर सुनीलच्या या स्वतंत्र कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.