विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची बातमी आता सर्वत्र पसरली आहे. गेल्या आठवड्यात विमान प्रवासादरम्यान या दोन विनोदवीरांमध्ये वादाची ठिणगी पेटली. ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर अगदी सख्ख्या मित्राप्रमाणे वावरणाऱ्या या दोन्ही कलाकारांमध्ये आता शत्रूत्त्व निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मात्र, लाखो चाहते असणाऱ्या त्यांच्या ‘द कपिल शर्मा शो’चं पुढे काय होणार? याबाबत दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे. या दोघांमधील वादानंतर या शोमधील सुनील ग्रोवरची जागा आता कपिलचा प्रतिस्पर्धी राहिलेला कृष्णा अभिषेक घेणार असल्याचे कळते.

कपिल शर्माने मेलबर्न ते मुंबई विमान प्रवासादरम्यान सुनीलचा बराच अपमान केला होता. त्याने रागात सुनीलवर शूज फेकूनही मारल्याचे म्हटले जातेय. या घटनेमुळे सुनील बराच दुखावला गेला असून, तो ‘द कपिल शर्मा शो’ सोडणार असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान, इतर काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तांनुसार, सुनीलच्या जागी विनोदवीर राजू श्रीवास्तवाची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर आता सुनीलच्या जागेवर राजू नव्हे तर कृष्णा अभिषेक येणार असल्याचे म्हटले जाते. ‘डीएनए’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील ग्रोवर शो सोडण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न कृष्णाला विचारला असता त्याने, ‘काही हरकत नाही… बहुधा कपिल आणि मी एकत्र काम करु,’ असे उत्तर दिले. कृष्णाचे हे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे असून, सुनीलच्या जागी त्याची वर्णी लागणार असल्याची ही पूर्वकल्पना तर नाही ना…..

krushna-abhishek

व्यावसायिक दृष्ट्या बघितले तर कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे भविष्यात हे दोघे एकत्र आल्यास त्यांना एकत्र काम करताना पाहणे नक्कीच रंजक राहील. मात्र, सुनीलने तो हा शो सोडणार की नाही, हे अद्याप सांगितलेलं नाही.