‘माय नेम इज बाँड.. जेम्स बाँड’ हा संवाद कोणाला माहित नाही अशी व्यक्ती दुर्मिळच. गेल्या ५५ वर्षांपासून जेम्स बाँड मालिकेतील सिनेमे बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालतायेत. सिनेमा इतिहासातील ही सर्वात मोठी सिनेमालिका आहे. जेम्स बाँडचा ‘डॉ. नो’ पहिला सिनेमा १९६२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर २०१५ मध्ये ‘स्पेक्ट्रे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता या मालिकेतील २५ व्या ‘शॅटरहँड’ सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘सीपीएल’वरुन सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल!

आतापर्यंत या सिनेमाचे मोशन पोस्टर, टीझर काहीही प्रदर्शित झाले नसले तरी या सिनेमाची कथा आणि खलनायकांची माहिती लीक झाली आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण क्रोएशियामध्ये होत आहे. या व्यतिरिक्त अन्य देशांमध्येही या सिनेमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. सिनेमात जेम्स बाँडच्या भूमिकेत डॅनियल क्रेग दिसणार आहे. जेम्स बाँड म्हणून डॅनियलचा हा शेवटचा सिनेमा असेल. याआधीही २०१५ मध्ये आलेल्या ‘स्पेक्ट्रे’ या सिनेमाची कथा लीक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इंडिपेंडंट या ब्रिटीश वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘शॅटरहँड’ची कथा ही २००१ मध्ये आलेल्या ‘नेव्हर ड्रीम ऑफ डाइंग’ या थरारपटावर आधारित आहे. या सिनेमाची कथा रेमंड बेनसन यांनी लिहीली होती.

सिनेमाची कथा-
पोलिस एका ठिकाणी छापा टाकतात, ज्यात अनेक निर्दोष व्यक्तींचा मृत्यु होतो. मृत पावलेल्यांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलेही असतात. जेम्स बाँडला या सगळ्या मागे ‘द यूनियन’चा हात असल्याचा संशय असतो. खलनायकाच्या शोधात बाँड पॅरिसमध्ये जातो. इथे त्याची ओळख टायलिन मिगनोनी हिच्याशी होते. दरम्यान, बाँड आणि टायलिन एकमेकांच्या प्रेमात पडतात. टायलिनच्या पतीचे ‘द युनियन’शी संबंध असतात. आत्तापर्यंतच्या बाँडपटांमध्येदेखील या ‘द युनियन’ ग्रुपचा उल्लखे अनेकवेळा अढळून आला आहे. सिनेमात क्रिस्टोफ वॉल्टज आणि डेव बतिस्ता हे खलनायकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर नेओमी हॅरिस आणि बेन विशॉ हे पुन्हा एकदा बाँडपटात दिसणार आहेत.