‘द ममी’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल’चा लूक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. टॉम क्रुझची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे. यामुळेच चाहत्यांनी काही क्षणातच या ट्रेलरला पसंतीही दिली आहे. या सिनेमाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यात तुम्हाला टॉम क्रुझच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमासारखेच विमानांची चित्तथरारक दृश्ये दिसतात.

या भागात देव आणि दानव यांची कथा सांगण्यात आली आहे. या ट्रेलरची सुरुवात एका विमानाच्या दृश्याने होते. विमानातून एका ममीला दुसरीकडे घेऊन जात असतात. या विमानात टॉम क्रुझही असतो. मुळ घटना इथूनच घडायला सुरुवात होते. थोड्या वेळात हे विमान जोर जोरात हलायला लागते. वैमानिक विमानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच, विमानावर वटवाघुळांचा हल्ला होतो. अचानक आलेल्या शेकडो वटवाघुळांमुळे विमानाच्या काचा तुटतात आणि विमानाचा ताबा सुटतो. या सर्व गोष्टी कळायच्या आत विमानाचा अपघात होतो. यात टॉम क्रुझही सापडतो.

दुसऱ्या दृश्यात मृत व्यक्ती ठेवणाऱ्या खोलीत प्लॅस्टीकमध्ये काही मृतदेह गुंडाळलेले दाखवले आहेत. पण अचानक त्यातला एक मृतदेह जागा होतो. तो म्हणजे टॉम क्रुझ. त्याच्या जीवंत होण्यासोबतच या सिनेमाची खलनायिका म्हणजे ममीही जीवंत होताना दाखवण्यात आली आहे. ही ममी एक राजकुमारी असते. फार वर्षांपूर्वी तिच्यावर जो अन्याय झालेला असतो. त्या अन्याायचा बदला घेण्यासाठी ती परत येते.

सोफिया बुटेला हिने ममीची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलर बघून ममीच्या आधीच्या भागांपेक्षा हा भाग नक्कीच वेगळा असेल असे सतत वाटत राहते. १९९९ ते २००८ या मध्ये द ममीचे अनेक भाग आलेले आहेत. मात्र टॉम क्रुझ पहिल्यांदा ‘द ममी’ सिनेमाच्या भागांशी जोडला गेला आहे. टॉम क्रुझ आणि सोफिया बुटेला यांच्याशिवाय या सिनेमात एनाबेल वॉलिस आणि जेक जॉनसन या कलाकारांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.