सत्तराव्या कान महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पाम डिओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या ‘द स्क्वेअर’ या चित्रपटास जाहीर झाला आहे. समकालीन कला जगत व त्यातून आधुनिक जगाचे प्रकटन या विषयावरील हा टीकात्मक चित्रपट असून ही निवड अपेक्षित नसली तरी वेगळी मानली जात आहे. सत्तराव्या वर्धापन दिनाचा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.

गेल्या ६६ वर्षांत प्रथमच स्वीडिश चित्रपटास हा पुरस्कार मिळाला असून २०१४ मध्ये ओस्टलंड यांच्या ‘फोर्स मेजर’ या चित्रपटास परीक्षकांचा पुरस्कार मिळाला होता. अल्फ सजोबर्ग यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ओस्टलंड हे दुसरे स्वीडिश दिग्दर्शक आहेत. सजोबर्ग यांना हा पुरस्कार १९५१ मध्ये मिस ज्युलीसाठी मिळाला होता. पाम डिओर पुरस्काराची घोषणा स्पॅनिश चित्रपट निर्माते व परीक्षक मंडळाचे अध्यक्ष प्रेडो अल्मोडोव्हर यांनी केली. फ्रेंच अभिनेत्री ज्युलियट बिनोशे हिने शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार ग्रँड थिएटर ल्युमियर येथे प्रदान केला. ग्रांड प्रिंक्स हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅमपिलो यांच्या १२०-बीट्स पर मिनिट या चित्रपटास मिळाला. ही पॅरिसच्या एड्स कार्यकर्त्यांची कथा आहे. कॅमपिलो हे मोरोक्कोत जन्मलेले आहेत. सोफिया कॉपोला यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘द बेगाइल्ड’ चित्रपटासाठी मिळाला असून स्त्रीवादावर आधारित क्लिंट इस्टवूड अभिनित चित्रपटाचे हे फेरसादरीकरण आहे. उत्कृष्ट पटकथा पुरस्कार ‘द किलिंग ऑफ सॅक्रेड डियर’ व ‘यू वेअर नेव्हर रिअली हिअर’ या चित्रपटांसाठी योरगॉस लॅन्थिमॉस व एफिथिमिस फिलीपो तसेच लिनी रॅमसे यांना विभागून मिळाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार यू वेअर नेव्हर रिअली हिअर या चित्रपटासाठी जोआकिन फिनिक्स याला तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जर्मन-अमेरिकन अभिनेत्री डायनी क्रुगर हिला ‘इन द फेड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला आहे. कॅमेरा डिओर पुरस्कार जेन फेमी यांना मिळाला. परीक्षकांचा विशेष पुरस्कार ‘लव्हलेस’ या चित्रपटास तर उत्कृष्ट लघुपट पुरस्कार ‘अ जेन्टल नाइट’ या चित्रपटास मिळाला आहे.

पुरस्कारांची यादी

  • कॅमडिओर पुरस्कार – जेन फेमी
  • उत्कृष्ट लघुपट – अ जेन्टल नाइट
  • परीक्षकांचा पुरस्कार – लव्हलेस
  • उत्कृष्ट अभिनेत्री – डायनी क्रुगर
  • उत्कृष्ट अभिनेता – जोआक्विन फिनिक्स
  • उत्कृष्ट दिग्दर्शक – सोफिया कोपोला
  • ग्रँड प्रिंक्स पुरस्कार – १२० बीट्स पर मिनीट
  • वर्धापन दिन पुरस्कार – निकोल कीडमन
  • पाम डिओर पुरस्कार – द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड)