रंगमंचावरील कामगारांची अवस्था सध्या बिकट आहे. नोटाबंदीनंतर तर ती भीषण होत चालली आहे. ही त्यांची व्यथा समजल्यावर सुरुवातीला माजी नाटय़व्यवस्थापक अशोक मुळ्ये आणि आता अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे पुढे आली आहे. मुळ्ये काकांनी या कामगारांना अन्न-धान्य पुरवले तर मुक्ताने ‘सखाराम बाइंडर’चे खास पाच प्रयोग केले आणि मिळकत रंगमंच कामगार निधीसाठी देण्याचे ठरवले. त्यानंतर रंगमंच कामगार संघटना नेमकी काय काम करते आणि त्यांच्या काय समस्या आहेत, हा प्रश्न काहींना पडणे साहजिकच आहे. त्यामुळेच या गोष्टी त्यांच्यापुढे मांडण्यासाठी हा प्रपंच.

[jwplayer j0GiBfHl]

राजाराम शिंदे यांनी तीस वर्षांपूर्वी रंगमंच कामगार संघाची स्थापना केली. त्यानंतर काही ठोस असं काम संघटनेकडून होताना दिसत नव्हतं. पण गेल्या आठ वर्षांपासून संघटनेला पुनर्जिवन मिळालं आणि ही संघटना पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे. प्रत्येक कामगाराकडून महिन्याला फक्त २० रुपये सदस्यत्व शुल्क घेतलं जातं. या निधीतून जर कोणत्या कामगाराचा अपघात झाला तर त्याला मदत देण्यात येते, कुणी मृत पावला तर त्याच्या कुटुंबीयांना मदत केली जाते, या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. जवळपास सहाशे सभासद या संघटनेमध्ये आहेत. या साऱ्यांचा विमा संघटनेने उतरवला आहे. त्याचबरोबर वर्षांतून एकदा या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय चाचणी केली जाते. या साऱ्या गोष्टी संघटना करत असली तरी त्यांच्याकडे निधीची वानवा आहे. त्यामुळेच त्यांना जास्त मदत या कामागारांना करता येत नाही. काही केल्या पैशाचं सोंग आणता येत नाही, हे खरेच.

काही महिन्यांपूर्वी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये अनंत मोघे यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा काही भार संघटनेने उचलला. त्यांना वाचवण्यात अपयश आले. पण संघटनेने त्यानंतर त्यांच्या मुलांच्या नावावर काही पैसे बँकेत जमा केले.

काही वर्षांपूर्वी कामगारांना एका प्रयोगाचे २०० रुपये मिळायचे. संघटनेने निर्मात्या संघाशी संवाद साधून ही किंमत ५०० रुपयांपर्यंत आणली. पण जर महिन्याला १०-१५ प्रयोग होत असतील तर या कामगारांनी करायचे काय, यासाठी संघटना प्रत्येक प्रयोगासाठी एक हजार रुपयांची मागणी निर्माता संघाकडे करणार आहे. पण निर्माता संघच सध्याच्या घडीला वाद-विवादांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे आणि याचा परिणाम या कामगारांच्या मानधनावर होत आहे.

नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळावर संघटनेचा एक प्रतिनिधी असतो. तो संघटनेच्या गोष्टी तिथे मांडतो. त्यानुसार कामगारांचा सत्कार, त्यांच्या समस्या याबाबतीत ठोस उपाय केले जातात. कामगारांची परिस्थिती पाहून नाटय़ परिषदेने त्यांच्यासाठी पेन्शनचीही तरतूद केली आहे. ती आहे फक्त दीड हजार रुपये. या संघटनेची सरकारदरबारी काही नोंद नाही. सरकारकडूनही ते दुर्लक्षितच. अजितदादा पवारांनी नाटय़ परिषदेसाठी पाच कोटींची मदत जाहीर केली होती, त्यामधील २५ लाख रुपये रंगमंच कामगार संघटनेला द्यायचे ठरलेही होते, पण आजगायत ही रक्कम संघटनेला मिळालेली नाही. ही रक्कम त्यांच्या पदरी कधी पडणार, याची कुणालाही माहिती नाही. या कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही. प्रत्येक नाटय़ संमेलनात अध्यक्ष घर मिळवून देण्याची आश्वासनं देतात, पण ही आश्वासन नेतेमंडळींसारखी हवेतच विरून जातात.

रंगमंच कामगारांचं काम अंगमेहनतीचं. त्यामुळे हे कामगार व्यसनाधीन असतात किंवा नेहमी मद्यपान करतात, असा एक गैरसमज आहे. पण सध्याच्या घडीला फार कमी कामगार या प्रकारचे असतील. संघटनेने मद्यपान करून काम करणाऱ्या कामगाराला मानधन देऊ नका, अशी ठोस आणि कडक भूमिकाही घेतली आहे.

‘रंगमंच कामगारांच्या हितासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. आमच्या परीने सर्वस्व झोकून देऊन आम्ही कामगारांना मदत करतो. पण ही मदत फारच तोकडी आहे, याची आम्हालाही जाणीव आहे. संघनेकडे जास्त पैसा नसल्याने जमेल तेवढी मदत आम्ही करतो. निर्माता संघ, नाटय़ परिषद काही प्रमाणात मदत करतात. पण सरकारने मदतीचा हात दिलेला नाही. सरकारने मदत केल्यास आमच्या बऱ्याच समस्या सुटतील. यापुढे कामगारांचा आरोग्य निधी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी- लग्नासाठी आम्ही काही योजना करू इच्छितो. संघटनेकडे पैसा आला तर या योजना अमलात आणू शकतो. सरकारने अजूनही कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवलेला नाही. या घरांसाठी देण्याचे पैसे या कामगारांकडे कुठून येणार? याचा विचार होणे गरजेचे आहे. मुक्ता बर्वे यांच्याकडून जो आम्हाला निधी मिळणार आहे, त्याचा एक वेगळा फंड काढण्याचा आमचा मानस आहे. ही मदत आमच्यासाठी मोलाचीच असेल,’ असं संघटनेचे अध्यक्ष रत्नकांत जगताप सांगत होते.

नाटकाचे सध्या शनिवार आणि रविवारीच जास्त प्रयोग होतात, त्यामुळे रंगमंचावरील कामगारांच्या पदरी महिन्याला ८-१० हजार रुपये पडतात. यापेक्षा अन्य राज्यांतून आलेल्या सुरक्षारक्षकाला जास्त पगार मिळतो. मग या मराठी लोकांनी या क्षेत्रात राहून रंगमंचासाठी काम का करायचे, हा प्रश्न संघटनेला भेडसावत आहे. या साऱ्या प्रकारामुळे मराठी माणूस या क्षेत्रात राहणार नाही, अशी भीतीही निर्माण होऊ लागली आहे. नाटकाच्या वेडापायी ही मंडळी या क्षेत्राशी जोडली गेली आहेत. नाटकावर, रंगमंचावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. नाटक पाहता यावं किंवा कलाकारांना जवळून बघता यावं, यासाठी ही मंडळी या क्षेत्राकडे वळतात आणि या क्षेत्राचीच होऊन जातात. हौस फिटते, पण पोटापाण्याचा प्रश्न काही सुटताना दिसत नाही.

रंगमंच कामगारांकडे कुणी गंभीरपणे लक्ष देताना दिसत नाही. फक्त आश्वासन देत नाही, तर करून दाखवतो, असे म्हणणाऱ्या मंत्र्यांना या कामगारांच्या समस्या दिसत नाहीत का? किंवा या लोकांची कामे करून प्रसिद्धी, वलय मिळणार नाही, म्हणून त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, हे कळत नाही. मराठीचा जयजयकार करणारे, नाटकाचे दर्दी चाहते म्हणवणारी मंडळी राजकारणातही आहेत, पण त्यांच्याकडूनही या कामगारांकडे पाठच फिरवली जाते. निर्माता संघ, नाटय़ परिषद आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना थोडीफार मदत करतात. पण ही मदतही कमी पडते किंवा ही मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे मुळ्ये काका किंवा मुक्ता वर्बे या लोकांना स्वत:हून पुढे येऊन मदत करावी लागते. यापुढे तरी या कामगारांची मेहनत पाहून सरकारला पाझर फुटणार का, हाच प्रश्न नाटय़वेडय़ांच्या मनात आहे.

प्रसाद लाड-  prasad.lad@expressindia.com

[jwplayer wZyE3FMT]