चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या प्रक्रियेमध्ये मिळणाऱ्या सिनेमॅटिक लिबर्टीचे सेन्सॉरने तीनतेरा वाजवले आहेत, असं अनेकांचच मत आहे. त्यातही गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये सेन्सॉरचा वाढता हस्तक्षेप पाहता काही दिग्दर्शकांनी तर आता चित्रपट दिग्दर्शन सोडावं का असा प्रश्नच उपस्थित केला आहे. अशा या संस्कारी सेन्सॉरचा सर्वाधिक फटका ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला बसला. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अतिशय महत्त्वाच्या पण तितक्याच संवेदनशील मुद्द्याला प्रभावीपणे मांडण्यात अलंकृता यशस्वी झाली असली तरीही तिला यश मिळवून देणाऱ्या या चित्रपटातील जवळपास २७ दृश्यांवर सेन्सॉरची कात्री चालली होती.

चित्रपटातील सध्याच्या दृश्यांपेक्षाही जास्त बोल्ड असणारी दृश्य वगळण्यात आली असून, तसं पाहिलं तर ही दृश्य चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने फार महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातय. ‘लिपस्टिक….’ या महिलाप्रधान चित्रपटात महिलांच्या समस्या आणि त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देताना काही दृश्यांमध्ये बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली असून, ती दृश्य बरीच बोल्ड असल्यामुळे त्यावर कात्री चालली आहे. ‘सेक्स’ या शब्दापलीकडे जाऊन त्या शब्दाच्या बाबतीत असणारा न्यूनगंड, महिलांमध्ये या एका शब्दाप्रती असणारे विचार त्या दृश्यांतून व्यक्त करण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. या चित्रपटातील नेमकी कोणती दृश्यं वगळण्यात आली आहेत हे खालील यादीतून लक्षात येतंय. या यादीत वगळण्यात आलेल्या ११ दृश्यांमध्ये चुकीच्या भाषेचा वापर, किसिंग सीन्सचा समावेश आहे.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

तसं पाहिलं तर सेन्सॉरतर्फे या चित्रपटाच्या मार्गात बरेच अडथळे निर्माण करण्यात आले होते. पण, सरतेशेवटी व्हायचं तेच झालं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जितक्या अडचणी आल्या तितकीच चित्रपटाची एका वेगळ्या मार्गाने प्रसिद्धीही झाली. प्रेक्षकांमध्ये ‘लिपस्टीक…’बाबतचं कुतूहल पाहायला मिळालं. परिणामी तिकीटबारीवरही या ‘लिपस्टिक….’चा गडद रंग पाहायला मिळतोय.