बॉलिवूडमध्ये सध्या महिलाप्रधान चित्रपटांची चांगलीच चलती आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगली पसंतीही मिळतेय. ‘क्वीन’ कंगना असो, विद्या बालन असो किंवा प्रियांका चोप्रा अनेकांनी स्त्रीप्रधान भूमिका साकारल्या आणि त्यांना न्याय दिला. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या एक विशिष्ट पठडीतल्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात किंबहुना त्या भूमिका या अभिनेत्रींमुळे उल्लेखनीय ठरल्या. जाणून घेऊयात कोण आहेत बॉलिवूडच्या या ‘परफेक्ट’ संस्कारी अभिनेत्री…

‘विवाह’मधील पूनम-
अभिनेत्री अमृता राव हिने सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘विवाह’ या चित्रपटात पूनमची भूमिका साकारली. एक ‘परफेक्ट’ संस्कारी मुलगी जी शुद्ध हिंदी बोलते, कुटुंबासाठी आणि नात्यांसाठी त्याग करते. ‘राजश्री प्रॉडक्शन’ अंतर्गत सर्व चित्रपट कौटुंबिक असतात. अमृताने उल्लेखनीय पूनमची भूमिका साकारत प्रेक्षकांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला.

Amrita Rao
अमृता राव

‘चोरी चोरी चुपके चुपके’मधील प्रिया-
या चित्रपटात सरोगसीचा विषय हाताळला गेला. यामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने प्रिया मल्होत्राची भूमिका साकारली होती. एकदा गर्भपात झाल्यानंतर पुन्हा गरोदर राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यावर प्रिया निराश होते. मात्र, नंतर पुढाकार घेऊन तीच सरोगसीचा विचार करते. सासरच्यांना ही गोष्ट कळून दु:ख होऊ नये यासाठी ती प्रत्येक गोष्ट लपवते. इतरांचा विचार सर्वांत आधी करणारी या चित्रपटातील प्रियाची भूमिका प्रेक्षकांना भावली.

Rani Mukerji
राणी मुखर्जी

‘इश्क विश्क’मधील पूनम- 
अभिनेत्री अमृता रावने ‘इश्क विश्क’ या चित्रपटात पायल या कॉलेज तरुणीची भूमिका साकारली होती. सुरुवातीला एकतर्फी प्रेमातून मिळणारा दगा आणि त्यानंतरही प्रियकराच्या आनंदाचा विचार करणारी पूनम प्रेक्षकांना विशेष आवडली. प्रेमाच्या अनोख्या संकल्पना तिच्या भूमिकेतून पडद्यावर मांडल्या गेल्या.

Amrita Rao
अमृता राव

‘मैंने प्यार किया’मधील सुमन-
दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा आणखी एक चित्रपट ज्यामधील अभिनेत्री भाग्यश्रीने साकारलेली सुमनची भूमिका प्रचंड गाजलेली. साधीभोळी, कुटुंबप्रिय अशी सुमन आपल्या प्रेमाचा त्याग करायलाही तयार असते. अभिनेता सलमान खान आणि भाग्यश्रीमधील केमिस्ट्रीमुळेही हा चित्रपट खूप गाजलेला.

Bhagyashree and Salman Khan
भाग्यश्री, सलमान खान