हल्लीच्या दिवसांमध्ये चोरीमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अगदी सेलिब्रिटीही अशा काही घटनांचे शिकार होत आहेत. रेडिओ जगतातील एक प्रसिद्ध आरजे मलिष्का हिच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. आरजे मलिष्काचा मोबाइल (आयफोन ७ प्लस) शनिवारी संध्याकाळपासून चोरीला गेला होता. पण, ४८ तासांनी तिला तो मोबाइल परत मिळाला आहे. इथे महत्त्वाची बाब अशी की, हा मोबाइल मलिष्काला तिच्या वांद्रे येथील घराजवळच सापडला.

सदर प्रसंगाविषयी सांगताना ‘मिड डे’ला दिलेल्या माहितीमध्ये मलिष्का म्हणाली की, ‘शनिवारी सायंकाळी मी वाहतूक पोलिसांचा एक कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी बॅगेतून घराच्या किल्ल्या काढण्यासाठी मी जिन्यावर बसले होते आणि त्यानंतर मी घरात गेले. दुसऱ्याच दिवशी मी ज्यावेळी माझा फोन शोधत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की माझा फोन माझ्याजवळ नाहीये. त्यावेळी माझ्या लक्षात आले की मी आदल्या दिवशी रात्री फोन जिन्यावरच विसरले होते. पण, ज्यावेळी फोन पाहण्यासाठी मी घराबाहेर आले त्यावेळी तिथे काहीच नव्हते. त्यामुळे मी माझ्या फोनचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती. त्यामुळे मी लगेचच वांद्रे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यावर लगेचच या प्रकरणीचा तपास सुरु झाला’.

मलिष्काने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिच्या इमारतीच्या आसपासच्या परिसरामध्ये तपास सुरु केला, काहीजणांची चौकशीही केली. या प्रक्रियेमध्ये इमारतीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. मोबाइलचा तपास सुरु असतानाच मलिष्काने तिच्या मोबाइच्या लोकेशनसंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी वोडाफोन कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर फोन केला. त्यावेळी तिला घराच्या जवळचेच लोकेशन दाखविण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाची तपास प्रक्रिया सुरु असतानाच मंगळवारी सकाळी मलिष्काची मोलकरीण ज्यावेळी घराबाहेरचा केर काढत होती त्यावेळीच कचऱ्याच्या डब्यात तिला काहीतरी चमकताना दिसले. त्यावेळी ती चमकणारी वस्तू काय हे पाहण्यासाठी ज्यावेळी मोलकरीण पुढे झाली तेव्हा तिला तिथे मलिष्काचा मोबाइल दिसला. या सर्व प्रसंगाविषयी सांगताना मलिष्का म्हणाली की, ‘मी या सर्व प्रकारामुळे थक्कच झाले होते. कारण त्या जागी मी आधीही मोबाइल शोधला होता’.
या सर्व गोंधळलेल्या परिस्थितीविषयी सांगताना वांद्रे पोलिस स्थानकातील एक अधिकारी म्हणाले, ‘काही पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते. मोबाइल हरवल्याची तक्रार दाखल होताच या मोबाइलचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात झाली होती’. हरवलेला मोबाइल, पोलीस तपास, चोरी असे विविध धागेदोरे असणाऱ्या या प्रकरणात नेमका फोन कोणाकडे होता हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.