तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले. जयललिता यांची प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असतानाच त्यांना रविवारी संध्याकाळी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. अखेर काल रात्री ११.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास जयललिता यांचे पार्थिव पोएस गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर सामान्य जनतेच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे.

वाचा: ‘ये दिल तुम बिन कहीं..’ , जयललिता यांच्या चित्रपटातील सहा प्रसिद्ध गाणी

राजकीय नेत्या म्हणून नावारुपास आलेल्या जयललिता यांना वकिल होण्याची इच्छा होती. पण चित्रपटसृष्टीने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली अन् राजनीतीवर त्यांची कारकिर्द संपली. जयललिता यांनी बंगळुरु येथे त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी राहून शिक्षण घेतले. त्यानंतर आईच्या सांगण्यावरून त्यांनी १५ व्या वर्षी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. १५ वर्षाची ही बालकलाकार पुढे जाऊन अभिनेत्री बनली. ‘रॉन्डेवू विथ सिमी गरेवाल’ शोमध्ये त्यांनी असे काही खुलासे केले होते जे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यावेळी आपल्या बालपणाबद्दल सांगताना जयललिता भावून झाल्या होत्या. या मुलाखतीत त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या आईचे आणि त्यांचे चित्रपटसृष्टीतील करियर सुरु झालेले याची माहिती दिली होती. त्यांच्या आईला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवून देण्यात त्यांच्या मावशीचा मोठा हातभार होता. तसेच, त्यांना लाइमलाइटपासून घृणा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

वाचा: जयललितांच्या निधनामुळे गडकरींच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन साधेपणाने

आपल्या बालपणाबद्दल सांगताना जयललिता म्हणालेल्या की, मी चार वर्षांची असताना आमचे संपूर्ण कुटुंब चेन्नईत राहायला आले. माझी आई चित्रपटांमध्ये व्यस्त झाल्याने माझा आणि माझ्या भावाचा सांभाळ घरातले नोकर करू लागले. आमचं अशाप्रकारे होत असलेलं पालनपोषण आईला योग्य वाटत नव्हतं. मग तेव्हापासून मी दहा वर्षांची होईपर्यंत माझ्या आजी-आजोबांकडे राहू लागले. मला तेव्हा आईची खूप आठवण यायची. तिला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती आम्हाला भेटायला यायची. पण असं फार कमी वेळा व्हायचं. मला आठवतं, मी पाच वर्षांची असताना आई मला भेटायला यायची. ती मला सोडून जायची तेव्हा मला रडू कोसळायचं. त्यामुळे जाण्यापूर्वी ती मला झोपवून जायची. मग मीही तिचा पदर हाताला बांधून झोपायचे. झोपताना मी आईचा पदर हाताला घट्ट बांधायचे. तिलाही ती गाठ सोडणं कठीण व्हायचं म्हणून मग ती पदर माझ्या हातात तसाच राहू द्यायची आणि साडी सोडायची. तीच साडी नंतर माझी मावशी गुंडाळून माझ्या बाजूला झोपायची. अशाप्रकारे ती कधी जायची ते मला कळायचं देखील नाही. जेव्हा मला ती गेल्याचं कळायचं तेव्हा मी फक्त रडत बसायचे. बंगळुरुमध्ये राहत असताना असा एकही क्षण नसेल जेव्हा मला आईची आठवण आली नाही, असे जयललिता म्हणाल्या होत्या.