‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या वादावरून निर्माता अनुराग कश्यप याने केलेल्या टीकेला बुधवारी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री राज्यवर्धन यांनी प्रत्युत्तर दिले. भारत हा लोकशाही देश आहे. तुम्हाला उत्तर कोरियात राहतोय, असे वाटत असेल तर मतदानच होऊन जाऊ द्या, असे आव्हानच राठोड यांनी अनुराग कश्यपला दिले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून ‘उडता पंजाब’ या चित्रपटात बदल सुचविण्यात आल्यानंतर काल अनुराग कश्यपने, मला उत्तर कोरियात राहत असल्यासारखे वाटतेय, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राठोड यांनी अनुरागला प्रत्युत्तर दिले. दरम्यान, चित्रपट निर्माता विकास बहल आणि अनुराग कश्यप यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात सेन्सॉर बोर्डाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
शीर्षकापासूनच ‘उडता पंजाब’ला ८९ कट्स! 

गेल्या आठवडय़ातच ‘उडता पंजाब’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडल्याची चर्चा होती. त्या वेळी चित्रपटाची सेन्सॉर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अनुरागने दिल्यामुळे ही चर्चा थांबली होती. मात्र पुन्हा एकदा चित्रपटातून ‘पंजाब’ वगळा या मागणीसह ८९ कट्स सुचवत सेन्सॉर बोर्डाची ‘निहलानी’ कात्री चित्रपटावर चालवण्यात आली आहे. इतकी काटछाट केल्यास चित्रपटाला अर्थच उरणार नसल्यानं संतापलेल्या अनुरागने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर टीका केली होती.