एकता कपूरचे नाव घेतल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात तिच्या भरपूर ड्रामा असलेल्या ‘क’च्या बाराखडीमधील मालिका! मृत व्यक्तिरेखा अचानक जिवंत होणे, एकाचे तीन-चारवेळा लग्न होणे, आजी आणि नात यांच्या वयाचा काहीही थांगपत्ता न लागणे हा या मालिकांमधील सर्व ड्रामा कमी करायचा असल्याचे, दस्तरखुद्द एकता कपूरनेच सांगितले आहे. त्यामुळे आता दूरचित्रवाहिन्यांवरील अतिरंजित, भडक दैनंदिन मालिकांचे युग लवकरच संपेल, अशी आशा दुणावली आहे.
‘क्यूंकी साँस भी कभी बहु थी’, ‘कहानी घर घर की’ सारख्या ‘क’च्या बाराखडीच्या मालिकांद्वारे घराघरातील महिलावर्गावर अनभिज्ञ राज्य करणाऱ्या एकता कपूरने एक मोठा काळ छोटा पडदा व्यापून टाकला होता. तिने सांगितलेला ‘फॉम्र्युला’ वाहिनीवर गाजणारच ही काळ्या दगडावरची रेघ असे.
 तिच्या प्रत्येक मालिकेमध्ये भडक पात्रे, न पटणारे कथानक हे सूत्र ठरलेले असे. ७ ऑक्टोबरपासून ती ‘लाइफ ओके’ वाहिनीवर ‘अजीब दास्ताँ है ये’ या मालिकेतून सोनाली बेंद्रे, अपूर्व अग्निहोत्री आणि हर्ष छाया अशी तगडी स्टारकास्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मालिकेची कथा सोनाली बेंद्रेने रंगवलेल्या ‘शोभा’भोवती फिरते. आपल्याकडील माहितीचा गैरवापर केल्याबद्दल शोभाच्या पतीला अटक होते. त्याच्या अटकेने बसलेल्या प्रचंड धक्क्यातून सावरतानाच संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही तिच्या खांद्यावर येते. या परिस्थितीतून स्वत:ला सावरत, शोभाने दिलेला लढा यावर ही मालिका आधारित आहे.
या मालिकेच्या निमित्ताने एकताने सांगितले की, ‘एक काळ होता जेव्हा माझ्या मालिकांमध्ये भरपूर फॅमिली ड्रामा असायचा. पण आता मला मालिकांमधील ड्रामा कमी करायचा आहे. मला थोडय़ा हलक्याफुलक्या आणि विनोदी मालिका बनवायच्या आहेत.’ आता खुद्द एकताने हे सांगितल्यावर भडक दैनंदिन मालिकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेक्षकांनी नक्की काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.
याआधी ‘ये है मोहबतें’ या मालिकेमध्ये हा प्रयोग केल्याचा दावा करीत ती म्हणाली, ‘मला आता एकूणच मालिकांचे स्वरुप बदलायचे आहे. आतपर्यंत माझ्या मालिकांमध्ये मी कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणारी सोशिक नायिका रेखाटत असे. आता मात्र मला प्रेक्षकांना दाखवून द्यायचे आहे की, स्वभिमानाचा प्रश्न येतो, तेव्हा हीच नायिका स्वत:च्या हक्कासाठी लढूही शकते. दरवेळी पती-पत्नीचे नाते सुरळीत असल्यास त्याचे श्रेय दोघांनाही मिळते, पण ते तुटल्यास त्याचे खापर संपूर्णपणे पत्नीच्या माथी मारले जाते. पण आता नाती तुटण्यामागे पतीचाही दोष असू शकतो, हे मला प्रेक्षकांना पटवून द्यायचे आहे.’ एकताने मालिकांमध्ये अतिरंजकपणा न दाखवता, मालिका अधिकाधिक वास्तववादी बनवण्याचा विचार यावेळी स्पष्ट केला आहे. दिवसेंदिवस आपला प्रेक्षक जाणकार होत आहे आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण हा बदल करत असल्याचे तिने सांगितले.